लस देणार नाही, तर बोलावलेच कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:26 AM2021-09-06T04:26:34+5:302021-09-06T04:26:34+5:30
कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संसर्गावर मात करण्यासाठी शासन स्तरावरून नागरिकांना मोफत लसीकरणाचे धोरण राबविले जात आहे; परंतु लोकसंख्येच्या तुलनेत लसीचा ...
कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संसर्गावर मात करण्यासाठी शासन स्तरावरून नागरिकांना मोफत लसीकरणाचे धोरण राबविले जात आहे; परंतु लोकसंख्येच्या तुलनेत लसीचा होत असलेला अपुरा पुरवठा यामुळे तालुकास्तरावर उपलब्ध लसीनुसार पुरवठा करून शासकीय रुग्णालयातून लस दिली जात आहे; परंतु अपुरा पुरवठा आणि नागरिकांची मागणी यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे रुग्णालयात गोंधळ निर्माण होत आहे. ग्रामपंचायतस्तरावरून टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयाला उपलब्ध होणाऱ्या लसीनुसार रुग्णालयांतर्गत येणाऱ्या गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत लसीचे नियोजन करण्यात येत आहे.
रुग्णालयात नियोजनाचा अभाव
४ सप्टेंबर रोजी उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रात दुसऱ्या डोससाठी २०० लसी प्राप्त झाल्या होत्या. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार उंबरे गावासाठी लोकसंख्येच्या तुलनेत ३८ डोस होते. याबाबतची माहिती उंबरे ग्रामपंचायतीला देणे गरजेचे होते; परंतु रुग्णालयप्रमुख डॉ. साखरे यांनी तसे न सांगता संबंधित ग्रामपंचायतीला दुसरे डोस आहेत, असे सांगितल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पहिल्या डोसचा कालावधी संपलेल्या नागरिकांना टोकन दिले; परंतु रुग्णालय प्रशासनाने ३८ पेक्षा जास्त लस उंबरे येथील नागरिकांना देता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि आम्हाला लस द्या; अन्यथा आम्ही लसीकरण होऊ देणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली.
स्थानिकांच्या दबावापुढे रुग्णालय प्रशासन झुकले.
४ सप्टेंबर रोजी उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राला दुसऱ्या डोससाठी २०० लस प्राप्त झाल्या. रुग्णालय प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला कळविल्याने नागरिकांनी टोकन घेऊन रुग्णालय गाठले; परंतु उंबरे येथील ग्रामस्थांनी अगोदर स्थानिकांना लस देण्याबाबत रुग्णालय प्रशासनावर दबाव टाकला. त्यामुळे लसीकरण बंद केल्याचा फार्स करून रुग्णालय प्रशासनाने बाहेरगावच्या नागरिकांना माघारी पाठविले आणि स्थानिक नागरिकांवर लसीची मेहरबानी केली. त्यामुळे बाहेरगावच्या नागरिकांना लस घेण्यासाठी किती दिवस हेलपाटे मारावे लागणार? हे मात्र अनुत्तरितच आहे.
कोट ::::::::::::
लस कमी आल्यामुळे अडचण निर्माण झाली. माघारी गेलेल्या नागरिकांना ६ सप्टेंबर रोजी लस देण्याचे नियोजन करू.
-डॉ. प्रभावती साखरे,
प्राथमिक आरोग्य केंद्र, उंबरे
कोट :::::::::::::::
ज्या पद्धतीने डॉ. साखरे यांनी आम्हाला दुसऱ्या डोससाठी टोकन देण्यास सांगितले, त्या पद्धतीने आम्ही टोकन दिले होते.
-महादेव शिंदे,
सरपंच प्रतिनिधी, उंबरे
कोट ::::::::::::
लस घेण्यासाठी ४० किमी अंतर जावे लागत आहे. असे असताना लस बंद करण्यात आल्याचे खोटे सांगून आम्हाला माघारी पाठवून पुन्हा लसीकरण करणे म्हणजे बाहेरगावच्या नागरिकांना रुग्णालय प्रशासनाकडून वेठीस धरण्याचा प्रकार चुकीचा आहे.
-अभिजित पाटील,
वंचित नागरिक, नेमतवाडी