मतदारांचा 'संभ्रम' की 'नाद' !
By admin | Published: December 31, 2015 01:57 PM2015-12-31T13:57:23+5:302015-12-31T13:58:10+5:30
विधानपरिषदेच्या निवडणुकीत तब्बल १५ मतपत्रिका बाद झाल्या आहेत. स्थानिक संस्था स्वराज्य संस्थेत प्रतिनिधीत्व करणार्या सदस्यांना मतदान कसे करावे, याबाबत प्रशिक्षण देऊनही त्यांनी गफलत केली
सोलापूर: विधानपरिषदेच्या निवडणुकीत तब्बल १५ मतपत्रिका बाद झाल्या आहेत. स्थानिक संस्था स्वराज्य संस्थेत प्रतिनिधीत्व करणार्या सदस्यांना मतदान कसे करावे, याबाबत प्रशिक्षण देऊनही त्यांनी गफलत केली. मतपत्रिकेतील अंकामध्ये १, २ आणि ३ हे त्यांना लिहिता येत नसल्याचेच या बाद मतपत्रिका पाहिल्यावर दिसून येते.
विधानपरिषद निवडणुकीसाठी पसंतीक्रमानुसार मतपत्रिकेवर मतदान करावे लागते. यासाठी जि.प. सदस्य, नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सभापती आणि मनपा नगरसेवकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रशिक्षणही देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार एक लिहिणे हे अंकामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे मराठी, इंग्रजी किंवा रोमन लिपीमध्ये १,२ किंवा ३ लिहिणे अपेक्षित होते. मात्र घडले भलतेच. यामुळे एक नव्हे तब्बल १५ मते बाद ठरविण्यात आली. १ आकडा फक्त एकाच उमेदवाराला लिहिता येत होता ज्यांनी दोघांना १ पसंतीक्रम दिला ती मतपत्रिका बाद ठरविण्यात आली. बाद झालेल्या १५ पैकी ६ मते भाजपची होती, २ राष्ट्रवादीची होती. दोन मतपत्रिकेवर १ दोन ठिकाणी लिहिले होते तर एक मतपत्रिका चक्क कोरी होती. भाजप ६ आणि राष्ट्रवादीची २ अशी आठ मते खूप गंमतशीर आहेत. काहींना १ लिहिता आले नाही काहींनी ना मराठी ना इंग्रजी ना रोमन अशा चमत्कारीत पद्धतीने आकडे गिरविले आहेत, खाडाखोड केली आहे त्यामुळे या मतपत्रिका बाद ठरविण्यात आल्या.
नगरपालिका, जि.प. आणि मनपा मतदारसंघातील सदस्यांच्याच या मतपत्रिका आहेत त्यामुळे या आपल्या लोकप्रतिनिधींना १, २ आणि ३ लिहिता येत नाही हे पुन्हा सिद्ध झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व करणार्या सदस्यांनीच असे केल्याने सर्वसामान्य मतदारांनी काय करावे?, हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)