राजकीय अस्तित्वहीन ‘उत्तर तालुक्या’चे मतदार दोन विधानसभा मतदारसंघांसाठी निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:41 PM2019-09-27T12:41:24+5:302019-09-27T12:45:29+5:30
राजकीय; शहर उत्तरमध्ये पाच हजार; मोहोळ मतदारसंघात ५५ हजार तर सोलापूर दक्षिणमध्ये २० हजार मतदार
अरुण बारसकर
सोलापूर : तीन विधानसभा मतदारसंघात विभाजन झाल्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्याचे अस्तित्व संपले असले तरी दोन मतदारसंघांसाठी निर्णायक मतदार आहेत. मोहोळ व सोलापूर दक्षिण मतदार विधानसभा मतदारसंघाचे निकाल उत्तर सोलापूर तालुक्यावर अवलंबून आहेत. शहर उत्तरमध्ये कोंडी व खेडच्या ५ हजार ३५४ मतदारांचा समावेश आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यात ३६ गावे असून या गावांचे तीन विधानसभा मतदारसंघात विभाजन झाले आहे. बीबीदारफळ पंचायत समिती (कोंडी वगळता), नान्नज पंचायत समिती व मार्डी (खेड वगळता) पंचायत समितीमधील २४ गावे ही मोहोळ राखीव मतदारसंघाला जोडली आहेत.
खेड व कोंडी ही गावे शहर उत्तर तर तिºहे पंचायत समितीमधील १० गावांचा समावेश सोलापूर दक्षिण मतदारसंघात केला आहे. तीन मतदारसंघात विभाजन झाल्याने उमेदवारीसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील कोणाचा विचार होत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर सोलापूर तालुक्याचे अस्तित्व राजकीयदृष्ट्या संपल्याचे दिसते. मात्र मतदारांची संख्या विचारात घेतली असता मोहोळ व सोलापूर दक्षिण मतदारसंघासाठी उत्तर तालुक्याचे मतदार निर्णायक ठरणार आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यातील ३६ गावांचे ८० हजार ८१० मतदार आहेत. यापैकी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील २४ गावांची मतदार संख्या ५५ हजार २८१ इतकी आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघाला जोडलेल्या १० गावातील मतदार २० हजार १५५ तर कोंडी व खेडची संख्या ५ हजार ३५४ इतकी आहे. तिन्ही मतदारसंघांना जोडलेल्या मतदारांची संख्या लक्षात घेतली असला उत्तर सोलापूर तालुक्याचे मतदार मतपेटीतून अस्तित्व दाखवू शकतात, असे चित्र आहे.
दिग्गज नेते; मात्र मतदारसंघ नाही..
- उत्तर सोलापूर तालुक्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी आ. दिलीप माने , राष्टÑवादीकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हे दिग्गज नेते उत्तर सोलापूर तालुक्यात आहेत. देशमुख व माने हे शहरात व सोलापूर दक्षिण मतदारसंघात राहत असल्याने त्यांना संधी मिळाली आहे. मात्र साठे व पवार यांना मतदारसंघ नसल्याने पंचायत झाली आहे. माजी पंचायत समिती उपसभापती संभाजी भडकुंबे हे २२ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य होत्या तर कन्या रजनी भडकुंबे या पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती आहेत.