अहो आश्चर्यम; दृष्टिहीनांचा ‘नॉनस्टॉप म्युझिकल हंगामा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 01:08 PM2019-04-08T13:08:52+5:302019-04-08T13:13:20+5:30
सोलापूर महापालिकेत सेवेत असलेले उत्कृष्ट ढोलकीपटू सतीश वाघमारे यांची दूरदृष्टी, वाघमारे हे स्वत: दृष्टिहीन असून, एकाच वेळी चार वाद्ये वाजविण्याची कला त्यांच्याजवळ आहे.
संजय शिंदे
सोलापूर : आपल्याच दृष्टिहीन बांधवांच्या कलेला वाव मिळावा, त्यांना उपजीविकेचे साधन मिळावे, यासाठी एका दृष्टिहीन कलाकारानेच पुढाकार घेऊन स्थापन केलाय एक ‘म्युझिकल हंगामा’ ग्रुप. या माध्यमातूनच इतर दृष्टिहीनांनाही मदत करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.
सोलापूर महापालिकेत सेवेत असलेले उत्कृष्ट ढोलकीपटू सतीश वाघमारे यांच्या पुढाकारातून हा ग्रुप स्थापन झालाय.
‘पंचरंगी नॉन स्टॉप म्युझिकल हंगामा’ असे नाव असलेला हा ग्रुप मराठी, हिंदी, पंजाबी गीतांबरोबरच लावणी, कव्वाली, गझल, भावगीते, भीमगीते, चित्रपट गीते, पोवाडे, लोकगीते, कोळीगीते अशी विविधरंगी गीते नॉन स्टॉप तीन तास सादर करुन श्रोत्यांचे मनोरंजन करणार आहे.
वाघमारे हे स्वत: दृष्टिहीन असून, एकाच वेळी चार वाद्ये वाजविण्याची कला त्यांच्याजवळ आहे. अकलूजच्या लावणी महोत्सवात चार वेळा त्यांनी आपली कला सादर केली आहे. महोत्सवात ‘उत्कृष्ट ढोलकीपटू’चा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. सोलापुरत झालेले नाट्यसंमेलनही त्यांनी आपल्या ढोलकीवादनाने गाजविले आहे. पुण्यातील नामांकित अशा ‘पठ्ठे बापूराव ढोलकी सम्राट’ या पुरस्काराचेही ते मानकरी ठरले आहेत. त्यांच्या सर्व कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये त्यांच्या पत्नी सुजाता वाघमारे-मेघाचे यांचा मोठा सहभाग असतो. त्या स्वत:ही उत्तम कलावंत आहेत. याच कार्यक्रमात त्या गायन करतात. सिंधी आणि पंजाबी गीते त्या उत्तम प्रकार सादर करतात.
दहा कलाकारांचा संच
- - त्यांच्या या ग्रुपमध्ये दहा कलाकारांचा समावेश असून, त्यातील सात कलाकार हे दृष्टिहीन आहेत. राज्यातील विविध भागांतील हे कलाकार असून, कलेच्या प्रेमापोटी हे सर्वजण एकत्र आले आहेत.
- - वाघमारे हे ताल वाद्याबरोबरच लोकगीत गायन व मिमिक्रीची जबाबदारी पार पाडत आहेत. मिरजचे सालम नदाफ व कोल्हापूरचे सचिन कांबळे- कीबोर्ड, सिंथेसायझर, भिलवडीचे मकरंद पारवे- गायक, सोलापूरचे सागर राठोड- मिमिक्री, गायक, अर्जुन वाघमोडे- गायक, राजेश्वर उडाणशिव- बासरी, मूळच्या साताºयाच्या व सध्या कोरगावात असलेल्या सुनीता सोनवणे आणि सुजाता वाघमारे- गायिका तर हनुमंत सगर हे व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत आहेत. साऊंड सिस्टिम गोपाळ भोसले यांची आहे.
- - येत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून हा ग्रुप रसिकांसमोर येणार असून, शिवजयंती, इतर महापुरुषांची जयंती, विवाह, वाढदिवस अशा विविधप्रसंगी हे कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
सर्व कलाकार दृष्टिहीन असले तरी त्यांची कला ही डोळस आहे. समाजानेही या कलाकारांचे कौतुक करुन त्यांच्या कलेला वाव देऊन या कलाकारांच्या पाठीवर थाप द्यावी, ही अपेक्षा आहे.
- सतीश वाघमारे
मुख्य संयोजक.