शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात निष्ठावंतांनी भाजपला मताधिक्य दिले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:51 PM2019-05-25T12:51:23+5:302019-05-25T12:57:03+5:30

सोलापूर लोकसभा निवडणूक विश्लेषण; भाजपचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघातील २२५ मतदान केंद्रांवर भाजपला मताधिक्य मिळाले आहे. 

In the northern constituency of the city, the loyalists voted for BJP! | शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात निष्ठावंतांनी भाजपला मताधिक्य दिले !

शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात निष्ठावंतांनी भाजपला मताधिक्य दिले !

Next
ठळक मुद्देभाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहर  उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांना सर्वाधिक ६३ हजार ६६७ मताधिक्य मिळालेप्रचाराला सुरुवात झाल्यानंतर पालकमंत्री आपल्याला विश्वासात घेत नाहीत, अशी ओरड सहकारमंत्री गट आणि भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केली

राकेश कदम

सोलापूर : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहर  उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांना सर्वाधिक ६३ हजार ६६७ मताधिक्य मिळाले आहे. भाजपला २६८ बूथपैकी २२५ बूथवर मताधिक्य मिळाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना केवळ १३ बूथवर तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना १३ बूथवर मताधिक्य मिळाले आहे. 

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख प्रतिनिधीत्व करतात. महापौर शोभा बनशेट्टी यांचा प्रभागही याच मतदारसंघात येतो. त्यामुळे भाजपला या मतदारसंघातून मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. पालकमंत्री देशमुख  डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांच्या उमेदवारी प्रयत्नशील होते.  शिवाय भाजपचे निवडणूक प्रमुखही होते. प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर पालकमंत्री आपल्याला विश्वासात घेत नाहीत, अशी ओरड सहकारमंत्री गट आणि भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केली. माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

या बैठकीत महाराजांचे काम करायचे पण आगामी विधानसभा निवडणुकीत देशमुखांना इंगा दाखविण्याचा निर्णय झाला. महाराजांसाठी एकमेकातील वाद विसरुन महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी, डॉ. किरण देशमुख, ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्यासह त्यांच्या नगरसेवकांनी केलेले काम भाजपसाठी महत्त्वाचे ठरले.

 वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आंबेडकरी चळवळीतील नगरसेवक, नेते एकत्र आले होते. या नेत्यांनी दररोज एकत्र फिरुन प्रचार केला होता. बुधवार पेठ, सम्राट चौक, हनुमान नगर या भागात भाजप, काँग्रेसला बूथ प्रतिनिधी मिळाले नव्हते. हा भाग वगळता इतर भागातून आंबेडकरांना फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विधानसभेचे स्वप्न सत्यात उतरणार का याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयुक्त प्रचार मोहिम राबविली. पण त्यांना मंगळवार पेठ परिसर वगळता इतर भागातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. 

देशमुखांच्या हक्कासोबत वाढणार इतरांची दावेदारी 

  • या मतदारसंघातून भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा या मतदारसंघावर निर्विवाद दावा असणार आहे. पण केवळ देशमुखच नव्हे तर आम्ही सुध्दा काम केलयं असे सांगून महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह देशमुख गटाचे पारंपरिक विरोधकही या मतदारसंघावर दावा ठोकतील. त्यातून भाजपत बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत वंचित बहुजन आघाडील अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. या परिस्थितीत वंचित आघाडीचे नेते काय करतील याकडे लक्ष आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने तुल्यबळ उमेदवार दिला तरच त्याचा निभाव लागणार आहे. 

Web Title: In the northern constituency of the city, the loyalists voted for BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.