अहिल्या नव्हे; अहल्या! नामकरणानंतर नवा वाद, ‘पुण्यश्लोकी’च हवे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:03 AM2019-03-08T05:03:08+5:302019-03-08T05:03:15+5:30
सोलापूर विद्यापीठाचे समारंभपूर्वक ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असे नामकरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नावाच्या व्याकरणावर व अर्थावर नवीनच वाद सुरू झाला आहे.
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचे समारंभपूर्वक ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असे नामकरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नावाच्या व्याकरणावर व अर्थावर नवीनच वाद सुरू झाला आहे. भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी ‘अहिल्या’ शब्दाला आक्षेप घेत ‘अहल्या’ असा उल्लेख करायला हवा, असे स्पष्ट केले आहे.
‘लोकमत’ शी बोलताना उत्पाद म्हणाले की, अहल्यादेवी होळकर या कर्तबगार स्त्री होत्या. त्यांचे नाव विद्यापीठाला देण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो; पण हा नामविस्तार करताना विद्यापीठाच्या भाषातज्ज्ञांनी अर्थ तपासून पाहायला हवा होता.
अहल्यादेवी होळकर यांचे कागदोपत्री नावही ‘अहल्या’ असेच आहे. श्रीमंत माधवराव पेशवेही त्यांना पाठविलेल्या पत्रांमध्ये ‘अहल्याबाई मातोश्री यांच्या सेवेशी’ असा उल्लेख करत असत. शिवाय महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या लेखात आणि आपल्या एका पुस्तकातही अहल्या असाच नामोल्लेख केलेला आहे, असे उत्पात यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाच्या नामविस्तारामध्ये पुण्यश्लोक असा करण्यात आलेला उल्लेखही व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचा आहे. पुण्यश्लोक हा पुल्लिंगी शब्द आहे. अहल्यादेवी यांच्या नावात पुण्यश्लोकी असा उल्लेख हवा होता, असेही ते म्हणाले.
>अहल्या हा मूळ संस्कृत शब्द आहे. जुन्या अनेक ग्रंथामध्ये अहल्या हा शब्द आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुण्यातल्या आश्रमासही अहल्या आश्रम असे नाव दिले. मात्र अलीकडे अहल्या या नावाचा अपभ्रंश अहिल्या नावानं रुढ झाला. रुढ शब्द आहे त्यानुसारच अहिल्या शब्द वापरला गेला असावा.
- प्रा. डॉ. दत्ता घोलप,
मराठी विभाग, सोलापूर विद्यापीठ