टिका नव्हे, व्यथा मांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:18 AM2021-04-03T04:18:48+5:302021-04-03T04:18:48+5:30
कुरुल : राज्यातील कोणत्याही कारखान्याने या हंगामातील पूर्ण एफआरपी अद्याप दिलेली नाही. याच अडचणींमुळे खुद्द सहकरमंत्र्यांच्या ...
कुरुल : राज्यातील कोणत्याही कारखान्याने या हंगामातील पूर्ण एफआरपी अद्याप दिलेली नाही. याच अडचणींमुळे खुद्द सहकरमंत्र्यांच्या कारखान्यानेदेखील एफआरपी पूर्ण केली नाही अशा आशयाची बातमी ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फक्त सभासदांच्या माहितीसाठी चेअरमन धनंजय महाडिक यांनी दाखविली आहे. यामध्ये महाडिक यांनी ना सहकारमंत्री पाटील यांच्यावर टीका केली ना जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर वैयक्तिक टीका केली. आम्ही फक्त आमच्या व्यथा, अडचणी शेतकऱ्यांपुढे मांडल्याचे मत भीमा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
जगताप पुढे म्हणाले की, भीमा साखर कारखान्याने २०१८-१९ च्या हंगामातील एफआरपीची पूर्ण रक्कम १५ नोव्हेंबर २०२० रोजी दिली आहे. त्याबद्दल साखर आयुक्तांनी निरंक असा दाखला दिला आहे. ते पत्र घेऊन आम्ही सहकारमंत्री आणि साखर आयुक्त यांच्याशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला. केवळ त्यावेळच्या १४ कोटी रुपयांसाठी आज थकीत एफआरपी निरंक होऊन चार महिने उलटले. तरीही ७० कोटी रुपयांच्या साखरेचे गोदाम महसूल प्रशासनाने सील केले आहे. व्याजाचा बोजा नाहक कारखाना आणि पर्यायाने शेतकऱ्यांवर पडणार आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पहिली उचल प्रतिटन दोन हजार रुपये जाहीर करून डिसेंबर २०२० अखेर पर्यंत शेतकऱ्यांना दिली आहे. उर्वरित एफआरपी ही साखर विक्री करून देण्याचे नियोजन संचालक मंडळ करीत आहे. मात्र, तीच साखर सील आहे. मग विक्री कशी करायची आणि एफआरपी द्यायची कशी..? असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला आहे.
याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील इतर सर्वच साखर कारखान्यांनीदेखील एफआरपी अद्याप पूर्ण दिलेली नाही. मग आरआरसीची कारवाई फक्त भीमा आणि दामाजी साखर कारखान्यांवरच झाली. कारवाईत दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
---
०२ सतीश जगताप