एसटी गाड्या धुण्यासाठी वेळ मिळेना, आगार व्यवस्थापकाची गाडी धुतली जाते; कर्मचारी संघाची तक्रार
By रूपेश हेळवे | Published: May 2, 2024 07:38 PM2024-05-02T19:38:11+5:302024-05-02T19:40:10+5:30
बार्शीचे आगार व्यवस्थापक हे आपली खासगी गाडी शासकीय कर्मचाऱ्यांना कामाला लावून डेपोमध्ये धूत असल्याचा आरोप सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने केला आहे.
रुपेश हेळवे, सोलापूर : एकीकडे एसटी गाड्या घाण असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. दुसरीकडे प्रवाशांची संख्या वाढल्याने गाड्या स्वच्छ करण्यासाठी कमी वेळ मिळत असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. पण, बार्शीचे आगार व्यवस्थापक हे आपली खासगी गाडी शासकीय कर्मचाऱ्यांना कामाला लावून डेपोमध्ये धूत असल्याचा आरोप सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने केला आहे.
शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. यामुळे राज्य परिवहन महामंडळातील सोलापूर विभागातील सगळ्याच गाड्या फुल्ल असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांची संख्या वाढत असताना, त्यांच्या सेवेसाठी वापरली जाणारी गाडी ही स्वच्छच असावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी गाडी वारंवार धुण्यात येत आहेत. पण, गाड्यांची संख्या वाढल्याने अनेक गाड्या स्वच्छ न करता मार्गावर सोडण्यात येत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.
पण, त्यातच बार्शी आगार व्यवस्थापक हे आपली खासगी गाडी एसटीच्या डेपोत आणून धुतात, अशा घटना वारंवार त्यांच्याकडून होत आहेत व त्यांची कार धुण्यासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांची व साहित्यांचा उपयोग केला जात असल्याची तक्रार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ही तक्रार नुकतीच करण्यात आली असून, याबाबतचे व्हिडीओ आणि फोटो सध्या ग्रुपवर व्हायरल होत आहेत. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे.