गोपीनाथराव नाहीत; महाराष्ट्र पोरका झाला!

By Admin | Published: June 8, 2014 01:14 AM2014-06-08T01:14:12+5:302014-06-08T01:14:12+5:30

मुंडे यांना श्रद्धांजली : नेते, कार्यकर्त्यांनी जागवल्या आठवणी

Not Gopinathra; Maharashtra became a minor! | गोपीनाथराव नाहीत; महाराष्ट्र पोरका झाला!

गोपीनाथराव नाहीत; महाराष्ट्र पोरका झाला!

googlenewsNext


सोलापूर : गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. त्यांना तळागाळातील जनतेच्या समस्या ठाऊक होत्या. कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्र पोरका झाला, अशा भावना भारतीय जनता पार्टीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी आज येथे व्यक्त केल्या.
भाजपाच्या ग्रामीण संघटनेने मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील शिवस्मारक सभागृहात सभेचे आयोजन केले होते. शहर आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मंचावर होते. यावेळी मुंडे यांच्या आठवणीने अनेक जण भावनाविवश झाले.
किशोर देशपांडे : जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात मुंडे हे पुण्याचे नेतृत्व करीत होते. माझ्याकडे सोलापूरचे नेतृत्व होते. या आंदोलनात प्रमोद महाजन, मुंडे यांच्यासह मलाही अटक झाली. आम्हाला नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात आले होते, तेव्हापासून माझे गोपीनाथरावांशी संबंध आहेत. मुंडे आज आपल्यात नाहीत; पण विपरीत काळात संघर्ष करीत विधायक काम कसे करायचे, हे आपण मुंडे यांच्या जीवनाकडे पाहून शिकू शकतो. स्वत: मोठे होत असताना इतरांना कसे मोठे करायचे, ही शिकवणही आपणाला त्यांच्याकडून मिळते. ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते.
सुभाष देशमुख : भाजपाची सत्ता स्वबळावर येण्यात मुंडे यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल ते नेहमीच संवेदनाशील असायचे. वंजारी समाज त्यांना देव मानायचा. त्यांची गाडी रस्त्यावरून गेली तर वंजारी समाजाचे लोक तेथील माती कपाळाला लावायचे.
शहाजी पवार : मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपाची पायाभरणी केली. अलीकडेच दुष्काळावर चर्चा करण्यासाठी त्यांनी माझ्यासह चार जिल्हाध्यक्षांना आपल्या निवासस्थानी बोलावले होते. त्यावेळी सोलापुरातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या आठवणी त्यांनी काढल्या. मुंडे यांना राज्याचा अभ्यास होता. ते धाडसी नेते होते. मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपाचा पाया घातला, त्यामुळेच आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना आज कळस होण्याचा मान मिळाला आहे.
रामचंद्र जन्नू : मुंडे हे १२ मे रोजी सोलापूर दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. त्यावेळी त्यांनी सोलापुरातील सर्व जुन्या नेत्या, कार्यकर्त्यांबद्दल चौकशी केली. तेव्हाच त्यांचं बोलणं मला खटकलं. ते निर्वाणीचे बोल बोलत आहेत, असे वाटले.
नागेश वल्याळ : माझ्या वयाच्या सहाव्या वर्षापासून मी मुंडे यांना पक्षवाढीसाठी कार्य करताना पाहत आलो आहे. ते पक्षासाठी अहोरात्र काम करायचे. माझे वडील लिंगराज वल्याळ यांना अर्धांगवायू झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सावरले. वडिलांच्या मृत्यूनंतर मला उद्योग उभा करून देण्यास सहकार्य केले.
आणीबाणीच्या काळापासून नंतर दीर्घकाळ सोलापूर भाजपाचे नेतृत्व किशोर देशपांडे यांच्याकडे होते. त्यामुळे देशपांडेंचा मुंडेंशी घनिष्ट संबंध होता. देशपांडे यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. सोलापूरचा कोणताही निर्णय घेताना मुंडे माझ्याशी चर्चा करायचे; नव्हे मला विचारूनच ते निर्णय घ्यायचे.
यावेळी चन्नवीर चिट्टे, वीरभद्रेश बसवंती, विष्णू जगताप, पंडितराज कोरे, दत्तुसा कल्पवृक्ष, सय्यद मुलाणी, गणेश चिवटे यांनीही मुंडे यांना शब्दांजली वाहिली.
-----------------------------------
बापूंना दिली होती जबाबदारी
सुभाष देशमुख (बापू) आणि मुंडे यांच्यात अलीकडे राजकीय सख्य नव्हते; पण २७ मे रोजी नवी दिल्लीत बापू-मुंडे भेट झाली. त्यावेळी बापूंवर भाजपाची जिल्हा कार्यालये बांधून देण्याची जबाबदारी टाकल्याची आठवण मुंडे यांनी करून दिली आणि पुन्हा ते काम सुरू करायला सांगितले. बीड येथे पाच एकर जागा देतो. ते भाजपाचे कार्यालय बांधून बीडपासून या मोहिमेची सुरुवात करा, असेही मुंडे म्हणाल्याची आठवण देशमुख यांनी यावेळी सांगितली.

Web Title: Not Gopinathra; Maharashtra became a minor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.