कानात सांगणाºयांना नव्हे; विजयी होणाºयांना भाजपची उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:50 PM2019-07-29T12:50:28+5:302019-07-29T12:54:00+5:30
सुरेश हळवणकर यांचे कार्यकर्त्यांना स्पष्टीकरण; शक्ती केंद्र प्रमुखांचा मेळावा
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडून येतील त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे. प्रदेश कमिटीने त्यासाठी सर्वेक्षण केलेले आहे. त्यामुळे इच्छुकांनी कुणाच्या तरी कानात सांगायचे, कुठेतरी वशिला लावायचा हे आता सोडून द्यावे. काँग्रेस-राष्ट्रवादीची संस्कृती इथे चालणार नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेश सरचिटणीस, आमदार सुरेश हळवणकर यांनी दिले.
भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुखांचा मेळावा रविवारी जामगुंडी मंगल कार्यालयात झाला, यावेळी ते बोलत होते. मंचावर सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा ग्रामीण प्रभारी अविनाश कोळी, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, माजी आमदार धनाजी साठे, माजी आमदार राजेंद्र राऊत, शहर प्रभारी उमा खापरे, सचिन पटवर्धन, दुधनी नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, कल्याणराव काळे, शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शहाजी पवार यांनी केले.
आमदार हळवणकर म्हणाले, प्रदेश कार्य समिती उमेदवारीचा निर्णय घेणार आहे. त्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. आपली पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी होऊ देऊ नका. काँग्रेस-राष्ट्रवादी संपली कारण त्यांचा जनमानसाशी संपर्क तुटला होता़ पण आज देशाचे पंतप्रधान पक्ष सोडून गेले तर भाजपला फरक पडणार नाही. ही संघटना कार्यकर्त्यांची संघटना आहे. या पक्षाचा कुणी मालक नाही. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर विधिमंडळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दु:ख झाले होते. आम्ही अनेक वर्षे सत्तेत नव्हतो. पण आमची मानसिकता पराभूत नव्हती. पण काँग्रेसच्या प्रमुखाने निवडणुकीनंतर राजीनामा दिला. काँग्रेसचा पक्षप्रमुख परदेशात चैन करतोय. त्या पक्षाचे टायटॅनिक झाले असून, त्यात कुणी बसायला तयार नाही, असेही त्यांनी सांगितले.
काही लोक कामे करुन घेण्यासाठी भाजपत
- पालकमंत्री देशमुख म्हणाले, अनेक लोक आज भाजपत येण्यासाठी इच्छुक आहेत. यातील अनेकांना उमेदवारी मिळणार नाही. पण हे उमेदवारीसाठी नव्हे तर आपली कामे करुन घेण्यासाठी पक्षात येत आहेत.
मोहिते-पाटलांची अनुपस्थिती
- शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत माढा, सांगोला, पंढरपूर या भागातील अनेक नेते मंचावर नव्हे तर खाली कार्यकर्त्यांमध्ये बसले होते. शक्ती केंद्र प्रमुखांच्या कामांचा आढावा हळवणकर यांनी घेतला. काही कार्यकर्त्यांना आपली कामे सांगता आली नाहीत त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या मेळाव्याला माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील अनुपस्थित होते.