तब्बल अडीच तास टीव्हीसमोर बसूनही सोलापुरातील लाभार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 03:01 PM2019-01-03T15:01:43+5:302019-01-03T15:04:11+5:30
सोलापूर : मुख्यमंत्री आपल्याशी संवाद करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाभरातील सुमारे २५ ते ३० घरकूल लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ ...
सोलापूर : मुख्यमंत्री आपल्याशी संवाद करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाभरातील सुमारे २५ ते ३० घरकूल लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी सकाळी साडेदहा वाजता उपस्थिती लावली. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधण्यास वेळेत सुरुवात केली. मात्र एक वाजल्यानंतरही सोलापूरशी संवाद साधण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ न मिळाल्याने वेळेअभावी लाभार्थी आपापल्या गावी परत गेले.
घरकूल मंजूर करण्यासाठी, अनुदान वितरित करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांकडून पैशांची मागणी करण्यात येते का, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील घरकूल लाभार्थ्यांनाच थेट विचारून त्यांना आश्चर्यचकीत केले. घरकूल योजनेतील लाभार्थ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी बुधवारी सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांसमवेत मुंबई येथून व्हिडीओ कॉन्फरन्सने थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक महिलांना हा प्रश्न विचारल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० पर्यंत सर्वांसाठी घरे ही योजना पूर्णत्वास आणण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही याबाबत पुढाकार घेण्यात आला आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री या दोघांचा दौरा घरकूल योजनेतील पूर्ण घरकुलाच्या उद्घाटनाचा कल दिसून येत आहे. अपूर्ण घरकुलांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी या दोघांचेही विशेष पुढाकार दिसून येत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्रीही प्रत्येक जिल्ह्यातील घरकूल योजनेतील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून या योजनेतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बुधवारी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका व ग्रामीण भागातील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत संवाद साधला. यावेळी त्यांनी घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना घरकूल बांधण्यासाठी वाळू मिळते का, शौचालय बांधण्यात येत आहे का, राहण्यासाठी घर कच्चे आहे का असे अनेक प्रश्न विचारून अडचणी जाणून घेतल्या असल्याची माहिती लाभार्थ्यांनी दिली.
अपूर्ण घरकुलांचे काम तातडीने पूर्ण करून घेण्याच्या सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय व्यवस्थेस केल्या. मुख्यमंत्र्यांकडून थेट अडचणी विचारण्यात येत असल्याने या लाभार्थ्यांच्या चेहºयावर समाधान दिसून येत होते. मुख्यमंत्र्यांच्या या व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांच्यासह महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील पंतप्रधान आवास योजनेतील अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते.
आमचा नंबर आलाच नाही
च्घरकुलासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलता येईल यासाठी सकाळी १०.३० पासून जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही बसलो आहोत; मात्र दुपारचे १ वाजून गेला तरी आमचा नंबर आला नाही. बैठक संपल्याने आम्ही गावाकडे परत जात आहोत, असे बार्शी तालुक्यातून आलेले लाभार्थी मीनाक्षी घोडके, रेश्मा वाघमारे, सुजाता सुरवसे यांनी सांगितले.