मुंबईचा नव्हे... माढ्याचा डबेवाला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 05:19 PM2019-07-01T17:19:46+5:302019-07-01T17:21:56+5:30
खडतर प्रवासाची ३२ वर्षे; सायकलीवरून दररोज २५ किलोमीटर पायपीट
अय्युब शेख
माढा: मुंबईमध्ये बहुसंख्य नोकरदार आणि विद्यार्थ्यांना न चुकता वेळेवर डबे पोहोचवणारा डबेवाला आपण पाहिला आहात.. अशाच पद्धतीने धावपळीत डबे पोहोचवणारा माढ्यात एक डबेवाला पाहायला मिळतोय. मागील ३२ वर्षांपासून ही सेवा ईशसेवा मानून करत आहेत. खडतर प्रवासाच्या जीवनात आज मागे वळून पाहिले की, ही सेवा सार्थकी लागल्याचे त्यांना वाटते.
दिलीप साळुंखे असे त्या अवलियाचे नाव आहे. माढा तालुक्यात दारफळ येथून ते सायकलीवर आपला प्रवास सुरू करतात़ सोलापूर शहरात २५ किलोमीटर सायकलीवर फिरून डबे पोच करण्याचे काम करीत आहेत.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी सोलापूर येथील औद्योगिक शिक्षण संस्था, इंजिनिअरिंग शिक्षणाला प्रवेश घेतात़ वसतिगृह किंवा खासगी ठिकाणी कॉटबेसिसवर खोली घेऊन राहतात़ या मुलांना घरचे जेवण पोच करण्याचे काम साळुंखे इमानेइतबारे करीत आहेत़ माढा शहर, उंदरगाव, केवड, सुलतानपूर व या परिसरातील विद्यार्थ्यांना ते सोलापूर येथे वसतिगृहात स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांना डबे पोहोचवताहेत़ या गरीब मुलांना मेसचे जेवण पचणार नाही, या भावनेपोटी पालकांनी दोन वेळचा डबा रोज सकाळी दिलीप साळुंखे यांच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केली़ दररोज सकाळी हे सर्व डबे गोळा करून रेल्वे स्थानकावर पोहोचवले जातात़ येथून मेल गाडीने सोलापूरला आणून सर्व डबे सायकलीला लावून विद्यार्थ्यांच्या रूमवर पोहोचवण्याचे काम २५ किलोमीटर सायकलीवर फिरून करत आहेत.
सात रुपये अन् बिझी शेड्युल
त्या वेळेस ते मासिक फक्त सात रुपये भाडे आकारून डबा पोच करत होते़ डबे झाल्यानंतर सोलापूरमधून विक्रीसाठी बटर व अंडी खरेदी करायची आणि माढ्यात रेल्वेने यायचे़ रोज दोन पोती बटर, एक हजार अंडी घेऊन यायचे आणि उंदरगाव, केवड, वाकाव, निमगाव, विठ्ठलवाडी या भागातील दुकानदारांना विक्री करायची़ अशाप्रकारचा दिनक्रम त्यांचा राहतो़ सध्या सकाळी या विद्यार्थ्यांना डबे पोच केल्यानंतर साळुंखे दयानंद महाविद्यालयामध्ये सायंकाळपर्यंत तीनशे रुपये मानधनावर माळी म्हणून काम करतात़ सायंकाळी मेल गाडीने पुन्हा माढा गाठतात़ सकाळी डबे घेऊन जातात. गेल्या ३२ वर्षांपासून साळुंखे डबे पोच करण्याचे काम करताहेत़ याव्यतरिक्त माढा शहर व परिसरातील कोणी सोलापूर शहरातील दवाखान्यात असल्यास या रुग्णांचा डबादेखील साळुंखे विनामोबदला पोच करतात़
मागे वळून पाहता त्यांचा ऊर भरून येतो
आजपर्यंतच्या सेवाकाळात ज्या-ज्या विद्यार्थ्यांना डबे पोहोचवले त्यापैकी बहुतांश मुले आज उच्चपदस्थ नोकरीस लागले आहेत़ काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही उद्योजक झाले़ दारफळ येथील आपल्या अत्यल्प शेतीमध्ये राबून उत्पन्न घेतात़ याशिवाय हे काम करून आपली दोन मुले, दोन मुली त्यांनाही चांगले शिक्षण दिले़ एक मुलगी इंजिनियर तर दुसरी एम़ कॉम़ शिक्षित आहे़ तसेच एक मुलगा इंजिनियर तर दुसरा वैद्यकीय अधिकारी आहे़ त्यांच्या या धावपळीच्या कार्यात पत्नीचाही हातभार असतो़ या साºया घडामोडींकडे ते कधी-कधी वळून पाहत तेव्हा त्यांचा ऊर भरून येतो़