केवळ साखरेचे उत्पादन न घेता इथेनॉलवरही जोर देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:24 AM2021-09-18T04:24:08+5:302021-09-18T04:24:08+5:30
अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याची ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह ...
अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याची ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील होते. या ऑनलाइन सभेस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, व्हा.चेअरमन ॲड. प्रकाश पाटील यांच्यासह संचालक व सभासद सहभागी झाले होते. उपस्थितांचे स्वागत, प्रास्ताविक, विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी केले. यावेळी तेरा विषयांना सभासदांनी ऑनलाइन मंजुरी दिली.
कोरोनाच्या काळात शेतीपिके, फळबागा, फुलबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला. सिंचनाच्या सुविधा वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील उसाचे उत्पादन वाढले. आज जिल्ह्यात ३९ साखर कारखाने आहेत. जागतिक बाजारपेठेत या कारखानदारीतून केवळ साखर उत्पादन करणे व विक्री करणे आता जिकिरीचे झाले आहे. त्यासाठी उपपदार्थ निर्मितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले.
यंदा सहकार महर्षी कारखान्याने १२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याने साखर उत्पादन कमी करून बी-हेवीपासून दोन कोटी लिटर इथेनॉल निर्मिती करण्याचे ठरविले आहे. कारखान्याने ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. निरा उजव्या कालव्यावर वीर धरणापासून समांतर पाईपलाईन टाकावी, कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना व्हावी, शेतकऱ्यांनी पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी शेततळी निर्माण करून ठिबक सिंचनचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. सेक्रेटरी अभयसिंह माने-देशमुख यांनी आभार मानले.
कारखान्यांच्या भागभांडवलात वाढ
शासनाने राज्यातील साखर कारखानदारांच्या भागभांडवलात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करताना कारखान्याने ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय घेतला. सभासदांनी या विषयास अनुसरून सूचना मांडली. ही कपात एक रकमी न घेता समान पाच हप्त्यात घ्यावी, असे सांगितले. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.