हायवेवर सोलापूरच्या वाहतुक पोलीसांकडून ‘नोट दो, आगे चलो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 08:34 PM2019-06-19T20:34:15+5:302019-06-19T20:38:19+5:30

सोलापूर जिल्ह्याबाहेरील वाहनांची अडवणूक; देवदर्शनासाठी परराज्यातून येणारे भाविक त्रस्त; सोलापूरची होतेय बदनामी

'Note two, let's move forward' from the traffic police of Solapur on the highway. | हायवेवर सोलापूरच्या वाहतुक पोलीसांकडून ‘नोट दो, आगे चलो’

हायवेवर सोलापूरच्या वाहतुक पोलीसांकडून ‘नोट दो, आगे चलो’

Next
ठळक मुद्देपरजिल्ह्यातील प्रवाशांची वेगवेगळ्या कागदपत्रांच्या नावाखाली केली जाते लूटसोलापूर होऊ लागलंय अवघ्या देशात बदनाम.. टाळू लागलेत भाविक सोलापूरलाचिरीमिरीसाठी सोलापूरच्या पर्यटन उत्पन्नाचा स्रोतच बंद पाडण्याचे दुष्कर्म

सोलापूर : पिढ्यान्पिढ्या माथी दुष्काळाचा शिक्का बसलेल्या सोलापूरला सध्या साथ मिळू लागलीय धार्मिक पर्यटनाची. शहराच्या आजूबाजूला असलेल्या तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट अन् गाणगापूरसाठी जिल्ह्यात येणारे बाहेरचे भाविक सिद्धेश्वरांच्या दर्शनालाही येतात. मात्र, या परजिल्ह्यातील प्रवाशांची केली जाते अडवणूक.  वेगवेगळ्या कागदपत्रांच्या नावाखाली केली जाते लूट. यामुळं सोलापूर होऊ लागलंय अवघ्या देशात बदनाम.. टाळू लागलेत भाविक सोलापूरला..  हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे.. चिरीमिरीसाठी सोलापूरच्या पर्यटन उत्पन्नाचा स्रोतच बंद पाडण्याचे दुष्कर्म आणलं पाहिजे आता उजेडात.. त्यासाठीच ‘लोकमत टीम’नं केलेलं हे ‘स्टिंग आॅपरेशन’..

विजापूर रोडवरून विजयपूर तसेच कर्नाटकातील इतर जिल्ह्यांतील वाहनेसुद्धा येतात. या वाहनांचा क्रमांक पाहून त्यांना अडवले जाते. यासोबत सोलापुरातील वाहनांचीही अडवणूक केली जाते. विजापूर नाका परिसरात वाहतूक शाखेचे एक नव्हे तर तीन पोलीस थांबलेले असतात. एकानंतर एक गाडी अडवली जाते. क्वचितच एखादे वाहन वाहतूक पोलिसांच्या नजरेतून सुटते. तसेच वाहतूक पोलिसांनी दुचाकी गाड्याही अडवल्याचे दिसून आले. शहरात जड वाहतुकीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी दिवसभरात काही काळ या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. यावेळेत जर कुणाला शहरातून मार्गस्थ व्हायचे असेल तर वाहन चालकाला हजार रूपये मोजावे लागतात.

 सोरेगाव परिसरातील विजापूर नाका येथे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांचे तीन बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी वाहनधारकांना गाडीचा वेग कमी करावा लागतो. वेग कमी होताच वाहतूक पोलीस वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करतात. कागदपत्रे किंवा वाहन चालवण्याचा परवाना नसल्यास त्यांना दंड भरावा लागतो. दंड भरल्याशिवाय तिथून वाहनांना सोडले जात नाही. यासाठी बराच वेळ तडजोड सुरू असते.

सोलापुरात येणाºया जिल्ह्याबाहेरील चारचाकी वाहनांना अडवून बाजूला घेतले जाते, चला लायसन्स काढा, गाडीची कागदपत्रे दाखवा... क्षमतेपेक्षा जास्त लोक आहेत. चला दंड भरा, अन्यथा कारवाई करतो, अशी धमकी देत बाहेरील प्रवाशांना त्रास देण्याचं काम, सध्या शहराच्या प्रत्येक नाक्यावर सुरू आहे. 

सोलापूर-मंगळवेढा रोडवरील देगाव नाक्याच्या पुढे दररोज ३ ते ५ वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उभे असतात. सकाळी ८ वाजता ड्युटीवर हजर होणारे पोलीस कर्मचारी ६ वाजता नाक्यावर असतात. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे वाहतूक शाखेचे तीन पोलीस कर्मचारी देगाव नाक्याच्या पुढे हजर झाले. पंढरपूर, मंगळवेढामार्गे सोलापुरात येणाºया दुसºया जिल्ह्यातील वाहने अडवली जात होते. एम.एच-०४, एम.एच-१०, एम.एच-०९ अशा गाड्या दिसल्या की, त्या रस्त्याच्या मधे थांबवून अडवल्या जात होत्या. या गाड्यांना बाजूला घेऊन हातात पावती पुस्तक दाखवत पहिल्यांदा चालकाचे लायसन्स विचारले जाते. लायसन्स दाखवले की, गाडीचे कागदपत्रे विचारले जात होते. कागदपत्रे दाखवले की, गाडीत माणसे जास्त आहेत, अशा वाहतुकीला परवानगी नाही. दंड भरा, असा प्रामाणिक सल्ला दिला जात होता. 

वाहनचालक म्हणतो, साहेब दंड कशाला करताय..., आम्ही खूप लांबून आलो आहोत, वेळेत जायचं आहे, सोडा आम्हाला, अशी विनंती करत होते. वाहतूक पोलीस म्हणतो मग काय... दंड भरा... किती? एक हजार रुपये भरा... नाही, इतके होणार नाहीत. मग किती भरता... साहेब दोनशे रुपये घ्या. वाहतूक पोलीस म्हणतो होणार नाही.. ५०० रुपयांची पावती करा. वाहनचालक म्हणतो खूप होतात, आमच्याकडे सध्या पैसे नाहीत... मग साहेब ३०० रुपये घ्या. वाहतूक शाखेचा पोलीस ठीक आहे.. द्या पैसे असे म्हणत, दोनशे रुपयांचा दंड केला जातो. हा दंड वाहन बेदरकारपणे व हयगयीने, जीविताला धोका होईल, अशा पद्धतीने चालवल्याबद्दल घेतल्याची पावती दिली जात होती. 

जिल्ह्याबाहेरील जडवाहनांच्या बाबतीतही अशीच स्थिती आढळून येत होती. वाहने अडवली जात होती, कागदपत्रांची मागणी करीत वाहन चालकाला दंडाची भीती दाखवली जात होती. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही गाडीच्या टपाची उंची जास्त आहे, असे कोणतेही एक कारण पुढे करून दंड भरण्यास सांगितले जाते. सकाळी ६ वाजता नाक्यावर आलेले वाहतूक शाखेचे पोलीस रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत आलटून पालटून कर्तव्य चोखपणे बजावताना दिसतात. 

एका चिठ्ठीवर मिळतो शहरात प्रवेश
च्कर्नाटकातील एका मालवाहू वाहनास विजापूर नाका येथे अडवण्यात आले. त्या वाहनचालकाकडे कागदपत्रांची कमी होती. हे ओळखून वाहतूक पोलिसांनी त्याच्याकडे दंडाची मागणी केली. पोलिसांनी १०० रुपये मागितले; मात्र ५० रुपयांवर सौदा झाला. वाहनचालकाने ५० रुपये दिल्यानंतर त्याच्या वाहनास सोलापूर शहरात सोडण्यात आले. त्याच्याकडे साध्या कागदावर लिहिलेली एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीवरून कर्नाटक पासिंगचे वाहन असल्यास कुणी अडवत नसल्याचे वाहनचालकाने सांगितले. आम्हाला सारखे सोलापुरात यावे लागते. यासाठी लागणारी कागदपत्रे आमच्याकडे नाहीत म्हणून पैसे देत असल्याचे वाहनचालकाने सांगितले.

‘त्या’ व्यक्तीला ४०० रुपये द्यावे लागतात
- शहरातून दिवसा काही काळासाठी जडवाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या बंदीच्या काळात वाहनांना शहरातून बाहेर जायचे असेल तर एक हजार रुपये मोजावे लागत असल्याचे एका ट्रकचालकाने सांगितले. जडवाहनांना शहरात येण्यासाठी बंदी असलेल्या काळात विजापूर रोडवरून शहरातून बाहेरच्या राष्ट्रीय मार्गावर जायचे असल्यास तेथील वाहतूक पोलिसाला ६०० रुपये द्यावे लागतात. त्यानंतर पोलिसांचा एक माणूस त्या वाहनाला शहराच्या बाहेर सोडतो. त्यावेळी बाहेर सोडणाºया पोलिसांच्या त्या व्यक्तीस ४०० रुपये द्यावे लागतात. असे एका ट्रक ड्रायव्हरने सांगितले. प्रत्येक रुपयाचा हिशेब मालकाला द्यावा लागतो, असे एक हजार रुपये शहरातून बाहेर पडण्यासाठी देण्याचे परवडत नसल्याचे एका ट्रक ड्रायव्हरने सांगतिले.

सोलापुरात टोलही भरावा लागतो... अन् दंडही !
- मुंबईवरून आलेली कार पंढरपूरहून दर्शन करून अक्कलकोटला दर्शनासाठी मंगळवेढ्यामार्गे सोलापुरात येत होती. कार देगाव नाक्यावर आल्यानंतर नेहमीप्रमाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अडवली. दंडाची रक्कम भरून गाडी निमूटपणे पुढे निघून गेली. पुढे या गाडीला थांबवून लोकमत चमूने चौकशी केली असता, प्रवाशाने नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात इतर ठिकाणी फिरताना टोल नाक्याव्यतिरिक्त कोठेही पैसे भरण्याची वेळ येत नाही. सोेलापुरात टोलही भरावा लागतो आणि वाहतूक शाखेचा दंडही द्यावा लागतो, अशी खंत व्यक्त केली. 

शहराच्या बाहेरील सर्व नाक्यांवर हीच स्थिती...
- शहराच्या बाहेरील नाक्यावर सर्वत्र हीच स्थिती दररोज पाहावयास मिळत आहे. रूपाभवानी मंदिराजवळील चौक, हैदराबाद रोडवरील श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड (बाजार समिती), नवीन अक्कलकोट नाका, विजापूर रोडवरील चौत्रा नाक्याच्या आलीकडे, मंगळवेढा रोडवरील देगाव नाका, जुना पुणे नाका पुलाजवळ सर्वत्र एका नाक्यावर ३ ते ६ वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दररोज नित्यनियमाने ड्युटी करीत असतात. 

Web Title: 'Note two, let's move forward' from the traffic police of Solapur on the highway.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.