सोलापुरातील ११११ कारखानदार, हॉस्पीटल, शोरूम्स अन् हॉटेल व्यावसायिकांना नोटीसा
By Appasaheb.patil | Published: January 15, 2021 02:10 PM2021-01-15T14:10:17+5:302021-01-15T14:10:23+5:30
महावितरण- १५ दिवसात वीजबिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित होणार
आप्पासाहेब पाटील
सोलापूर - ज्यांचा वीजवापर अधिक आहे, ज्यांच्याकडे थकबाकी लाखोंच्या घरात आहे अशा सोलापूर शहर व जिल्ह्यातील १ हजार १११ कारखानदार, हॉस्पीटल, शोरूम्स, लॉजेस, हॉटेल व्यावसायिक व अन्य ग्राहकांना विद्युत कायदा २००३ च्या कलम ५६ (१) नुसार नोटीस बजाविण्यात आली आहे. १५ दिवसात थकबाकीचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याचाही इशारा देण्यात आल्याचे महावितरणच्या अधिकार्यांनी सांगितले.
मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचे संकट सुरु झाल्यानंतर महावितरणच्या आर्थिक संकटाला देखील सुरवात झाली. कोरोना संकटातील ‘लॉकडाऊन’मध्ये रिडींग घेता आले नाही. ‘अनलॉक’नंतर देण्यात आलेल्या सरासरी वीजबिलांची योग्य दुरुस्ती करण्यात आली. तसेच मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देण्याची प्रक्रिया देखील पूर्ववत झाली. गेल्या एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील २ लाख ८९ हजार २८३ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी माहे नोव्हेंबरपर्यंतच्या एकाही वीजबिलाचा भरणा केला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे थकबाकीमध्ये तब्बल १८१ कोटी ४५ लाख रुपयांची भर पडली आहे.
वीजबिल भरा...कारवाई टाळा...
नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसाच्या आत थकबाकीचा भरणा न केल्यास दुसरी नोटीस न देता संंबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्यानंतर वीजपुरवठा पुर्ववत करण्याकरिता नियमाप्रमाणे पुर्नजोडणी भार आकारला जाणार असल्याचे महावितरणकडून नोटीसीव्दारे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वीजबिल भरून कारवाई टाळावी असे आवाहन महावितरण सोलापूर मंडलचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले आहे.
बड्या उद्याेजकांकडे थकले २६ कोटी...
सोलापूर शहर व जिल्ह्यातील कारखानदार, हॉटेल व्यावसायिक, शोरूम्स, हॉस्पीटल्स, राष्ट्रीय कंपन्यांचे कार्यालये अशा १ हजार १११ वीजग्राहकांकडे २६ कोटी ४८ लाख रूपयांची थकबाकी आहे. कोरोनानंतर सर्वकाही सुरळीत सुरू असतानाही या उद्योजकांनी वीजबिल भरण्यास टाळाटाळ होत असल्याचे महावितरण प्रशासनाने सांगितले.
ज्या वीजग्राहकांचा वीजेचा वापर व थकबाकी मोठया प्रमाणात आहे अशा मोठया थकबाकीदारांना वीजबिल भरण्याविषयी नोटीसा देण्यात आल्या आहेत. शहरात ३ कोटी ५१ लाखांच्या थकबाकीपोटी २७३ जणांना नोटीस देण्यात आली आहे. थकबाकीदार ग्राहकांनी वीजबिल भरून महावितरण प्रशासनास सहकार्य करावे.
- चंद्रकांत दिघे,
प्रभारी शहर अभियंता, महावितरण, सोलापूर