त्रुटी आढळल्याने सोलापूर जिल्ह्यातील ७ छावणी चालकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:59 PM2019-07-17T12:59:40+5:302019-07-17T13:01:15+5:30
अचानक दिलेल्या भेटीत आढळल्या त्रुटी; जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले याची कारवाई
सोलापूर : जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांना अचानक दिलेल्या भेटीत त्रुटी आढळलेल्या ७ छावणी चालकांना कारणे दाखवा नोटिसा बजाविल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
नोटिसा दिलेल्या करमाळा तालुक्यातील वीट येथील स्व. कांतीलाल आवटे बहुउद्देशीय सहकारी संस्था, मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथील नेहरू युवा मंडळ, शिरापूर येथील सूर्योदय कला व क्रीडा मंडळ, वडवळ येथील सूर्योदय कला व क्रीडा मंडळ, वडदेगाव येथील महात्मा फुले संस्था, माढा तालुक्यातील तुळशी येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी पतसंस्था गंगामाईनगर आणि दत्त बहुउद्देशीय विकास मंडळ, अरण या संस्थांचा समावेश आहे. या चारा छावण्यांना जिल्हाधिकाºयांनी भेट दिल्यावर नियमाप्रमाणे जनावरांना कोड दिलेला नसणे, जनावरांची संख्या यामध्ये त्रुटी आढळल्या आहेत.
चारा छावण्या सुरू करताना संबंधित संस्थांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आले होते. यात खोटे प्रमाणपत्र दिलेल्या सांगोला येथील ८४ तर मंगळवेढा येथील ६९ छावणी चालक, संस्थेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चारा छावण्यांसाठी शासनाकडून अनुदान मंजूर झाले आहे. हे अनुदान तहसीलदारांमार्फत छावणी चालकांना वाटप करण्यात आले आहे. छावणी चालकांनी सादर केलेल्या चारा, पेंड, सुग्रास खरेदी पावत्यावरूनच ही बिले देण्यात आली आहेत.
पहिल्या टप्प्यात २ कोटी ६३ लाखांचे वाटप करण्यात आले होते. जून महिन्यासाठी अनुदान वाटपासाठी शासनाकडे पैशाची मागणी केली होती. त्याप्रमाणे अनुदान आले असून, २८ कोटी ६७ लाख रुपये वितरणासाठी तहसीलदारांकडे देण्यात आले आहेत. पण दुसºया टप्प्यात छावणी चालकांकडून बिलाची मागणी करण्यात विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यात मागणीप्रमाणे शासनाकडून आलेल्या २८ कोटी ६७ लाखांची अनुदान बिले चारा छावण्यांना देण्यात आली आहेत.
२७१ चारा छावण्या
जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुका वगळता दहा तालुक्यातील १७६ गावात २८४ संस्थांना चारा छावण्या सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. यापैकी २७१ संस्थांनी चारा छावण्या सुरू केल्या. या छावण्यांमध्ये १ लाख ६९ हजार ३१७ मोठी तर २१ हजार ९६५ लहान अशी एकूण १ लाख ९१ हजार २८२ जनावरे दाखल झाली आहेत. चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांना नोंदणी कोड देण्यात आला आहे.