राजहंस कुक्कुटपालन संघाला अंतरिम अवसायकाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:25+5:302021-06-09T04:27:25+5:30
सोलापूर : अकलूज येथील राजहंस कुक्कुटपालन संघावर अवसायक नेमण्याची अंतरिम नोटीस विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी बजावली आहे. ...
सोलापूर : अकलूज येथील राजहंस कुक्कुटपालन संघावर अवसायक नेमण्याची अंतरिम नोटीस विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी बजावली आहे. खुलासा देण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.
माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे राजहंस कुक्कुटपालन संघाचा विस्तार, मालमत्ता व सभासद मोठ्या प्रमाणावर आहेत. या संघाचे कामकाज गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. संस्थेने लेखापरीक्षण केले का, याची विचारणा सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) सोलापूर आबासाहेब गावडे यांनी केली असता मागील पाच वर्षांपासून कामकाज बंद असल्याचे लेखापरीक्षण अहवालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच संघाच्या सभासदांचेही उत्पादन सुरू नसल्याचे आढळले आहे.
याबाबत विचारणा केल्याप्रमाणे कुक्कुटपालन संघाने ३१ ऑगस्ट २०२० रोजी दिलेल्या खुलाशावरून अद्यापही संघाचे कामकाज बंदच असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे. यामुळे आपला खुलासा समाधानकारक नसल्याने संघाविरोधात महाराष्ट्र राज्य. संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२(१) (क) (२) व (४) अन्वये अंतरिम अवसायनात घेण्याची कारवाई केली आहे.
संघावर सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) सोलापूरचे आबासाहेब गावडे यांची अवसायक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याचा खुलासा एक महिन्यात सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
----
केवळ अडीचशे दूध संस्था तग धरून
जिल्ह्यात सहकार कागदावरच असून जिल्ह्यातील बहुतेक सहकारी साखर कारखाने बंद आहेत. कसेबसे चालत असलेल्या साखर कारखान्यांवर मोठे कर्ज आहे. दूध संस्थांचीही अशीच स्थिती असून नोंदणी झालेल्या अडीच हजारपैकी दोन-अडीचशे संस्था तग धरून आहेत. सूतगिरणी व इतर सहकारी संस्थांचे फलकही जागेवर राहिलेले नाहीत.