सोलापूर शहरातील ८५ गाळेधारकांना महापालिका बांधकाम विभागाकडून नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 02:40 PM2018-06-08T14:40:04+5:302018-06-08T14:40:04+5:30
अनधिकृत बांधकामधारकांमध्ये खळबळ
सोलापूर : रविवार पेठ परिसरात असलेल्या २५६ गाळ्यांमधील अतिरिक्त अनधिकृत बांधकामे केलेल्या ८५ गाळेधारक घरांना महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून नोटिसा देण्यात आल्याची माहिती नगर अंभियता संदीप कारंजे यांनी दिली. या प्रकारामुळे सध्या गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
रविवार पेठेतील २५६ गाळ्यांमधील अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावरून गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेत चर्चा सुरू आहे. या परिसरातील गाळेधारकांपैकी सुमारे ८५ गाळ्यांतील घरधारकांनी आपल्या मूळ बांधकामाबरोबर त्यांना दिलेल्या परवान्यापेक्षा त्याव्यतिरिक्त अतिरिक्त बांधकाम केले असल्याचे तपासात दिसून आले आहे. त्यांच्या या अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता.
यावरून या गाळेधारकांकडून अनेकांनी महापालिकेकडे यावर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडे प्रयत्न केले. महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनीही बैठका घेऊन त्यांना त्यांचे बांधकाम पाडण्यास किंवा नियमित करून घेण्यासाठी सांगितले होते. मात्र संबंधित गाळेधारकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून पुढील कार्यवाहीला प्रारंभ करण्यात आला आहे.
याचाच एक भाग म्हणून बांधकाम विभागाने महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९६६ चे कलम ५५ अन्वये अनधिकृत व अतिरिक्त बांधकामधारक ८५ गाळ्यांना नोटीस पाठविली आहे. त्यांना १५ दिवसात आपले अतिरिक्त अनधिकृत बांधकाम स्वत:हून पाडून घ्यावे, असे सांगून त्यांना १५ दिवसांची मुदत दिली असल्याचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बांधकाम पाडा, अन्यथा कारवाई अटळ
- २५६ गाळ्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या ठिकाणी बºयाच गाळेधारकांनी अनधिकृत बांधकाम करुन नियमांचे उल्लंघन केले आहे. ही बाब महापालिका प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर संबंधितांना अनेकवेळा सूचना देण्यात आल्या. मात्र याकडे गाळेधारकांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. यामुळे महापालिकेने कारवाईचे हत्यार उपसले असून दिलेल्या वेळेत जर अनधिकृत बांधकाम पाडून घेतले नाही तर संबंधितांवर कारवाई अटळ आहे.
- अनधिकृत बांधकामाबाबत वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. सध्या ८५ जणांना नोटिसा दिल्या आहेत, अन्य संबंधितांनी दिलेल्या मुदतीत अनधिकृत बांधकाम न पाडल्यास महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून पाडण्यात येईल व त्याचा खर्च संबंधित गाळेधारकाकडून वसूल करण्यात येणार आहे.
- - संदीप कारंजे, नगर अंभियता