दांडिया कार्यक्रमास बोलावून अभिनेत्रीशी असभ्य वर्तन, माजी नगरसेवक पूत्राला नोटीस
By विलास जळकोटकर | Published: November 17, 2023 05:54 PM2023-11-17T17:54:32+5:302023-11-17T17:54:45+5:30
वीस दिवसानंतर ताब्यात : नोटिसीद्वारे दिली समज
सोलापूर : नवरात्रोत्सवात दांडिया फेस्टिव्हलला अभिनेत्रीला बोलावून तिच्याशी असभ्य वर्तन केल्याबद्दल माजी नगरसेवक पूत्र चेतन गायकवाड यास सदर बझार पोलिसांनी शुक्रवारी कंबर तलाव येथून ताब्यात घेतले. त्यास पुन्हा असे कृत्य करणार नाही अशी नोटीस बजावण्यात आली. यापूर्वी तिघांनाही नोटिस बजावली होती. या प्रकरणी पोलीस अधिकारी ज्योत्सना भांबिष्टे यांनी फिर्याद दिली होती.
सोलापुरात नवरात्रोत्सवात २२ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ‘दुर्गाष्टमी दांडिया फेस्टिव्हल’चे आयोजन केले होते. २२ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमासाठी अभिनेत्रीला बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात चेतन गायकवाड (वय- २८), प्रथमेश उर्फ सोनू प्रशांत खरात (वय- २२), तुषार सुबोध गायकवाड (वय- २१),नागेश यशवंत येलगेरी (वय- १९, सर्व रा. सोलापूर) विनयभंग करण्याच्या उद्देशाने अश्लिल शब्द व हावभाव करुन अपमानित केले, तसेच सोशलमिडियावरही अभिनेत्रीबद्दल अश्लिल पोस्ट केल्याची फिर्याद २६ ऑक्टोबर रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदली होती.
या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन सीआरपीसी ४१ अ १ प्रमाणे नोटीस देऊन सोडले होते. चेतन गायकवाड त्या घटनेपासून पोलिसांना चुकवत होता. शुक्रवारी त्यास कंबर तलावावजळ ताब्यात घेण्यात आले. त्याला नोटीस बजावून पुन्हा असे कृत्य करणार नाही अशी समज नोटिसीद्वारे बजावण्यात आली.
म्हणून सूत्रे हलली...
या घटनेनंतर कार्यक्रमासाठी आलेल्या अभिनेत्रीने महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलीस आयुक्तालयाकडे पत्र प्राप्त झाले. त्यानुसार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी कारवाईचे आदेश बजावताच सदर बझार पोलिसांनी गुंगारा देणाऱ्या चेतन गायकवाड शुक्रवारी कंबर तलाव येथून ताब्यात घेऊन नोटीस बजावल्याचे पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी सांगितले.