उपमहापौरांसह १५० कर्मचाऱ्यांना नोटिसा
By admin | Published: June 20, 2014 12:46 AM2014-06-20T00:46:43+5:302014-06-20T00:46:43+5:30
मनपा : हद्दवाढ भरती प्रकरण
सोलापूर: हद्दवाढ भरतीप्रकरणी महापालिकेने ३०० पैकी १५० कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत़ यामध्ये उपमहापौर हारुन सय्यद यांचा देखील यात समावेश असून, मनपामध्ये हे भरती प्रकरण सध्या जास्त गाजत आहे़ उर्वरित १५० कर्मचाऱ्यांनादेखील लवकरच नोटिसा पाठविण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी पत्रकारांना दिली़
याप्रकरणी त्यावेळच्या ११ ग्रामपंचायतींचे सरपंच, मनपातील अधिकाऱ्यांना देखील मनपाने नोटिसा पाठविल्या आहेत़ उपमहापौर हे महापालिकेत सेवक होते, त्यांची भरती देखील मजरेवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाली आहे़ मात्र त्यांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या वेळी मनपा सेवेला रामराम ठोकला आहे़ ५ मे १९९२ साली झालेल्या हद्दवाढीत ११ गावे समाविष्ट करण्यात आली़ रातोरात कर्मचारी भरती करुन ग्रामपंचायतींनी आपल्याकडे जास्त कर्मचारी असल्याचे बोगस रेकॉर्ड तसेच सेवापुस्तके तयार करून मनपाची फसवणूक केली़ २२ वर्षांनंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे़ मजरेवाडी ग्रामपंचायतीने २१० तर उर्वरित १० ग्रामपंचायतींनी आपले ९० कर्मचारी मनपामध्ये घुसविले आहेत़
हा संगनमताने केलेला घोटाळा असून यात मनपाची फसवणूक झाली आहे़ कायदेशीर अभिप्राय घेऊन पहिल्या टप्प्यात सर्वांना नोटिसा पाठवून नंतर फौजदारी केली जाणार आहे, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली़ त्यामुळे ३०० कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे़