ब्लेझर न वापरणाºया सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना आज नोटिसा बजाविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:37 AM2018-11-22T10:37:24+5:302018-11-22T10:40:11+5:30
खुलासा मागविणार: यादी करण्यासाठी लागले ४८ तास
सोलापूर : झेडपी प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे १९ नोव्हेंबर रोजी स्थानिक ड्रेसकोडबरोबर काळ्या रंगाचा ब्लेझर न वापरणाºया शिक्षकांना २२ नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात येणार आहेत.
झेडपी सभेने प्राथमिक शाळेतील शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रंग ठरविण्यासाठी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत स्थानिक ड्रेसकोडबरोबरच काळ्या रंगाचा ब्लेझर वापरण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पुन्हा शिक्षक संघटनांनी ब्लेझरला विरोध सुरू केला. त्यावर प्रशासनाने कडक भूमिका घेत १९ नोव्हेंबरपासून स्थानिक ड्रेसकोडबरोबरच ब्लेझर वापरण्याबाबत परिपत्रक जारी केले. त्यावर संघटनांचा विरोध आणखीनच वाढला. झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांच्यावर संघटनांच्या प्रतिनिधींनी दबाव वाढविला. पण प्रशासनाने हा निर्णय पुढील सभेशिवाय मागे घेता येत नाही हे स्पष्ट करूनही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींचा विरोध कायम राहिला.
परिपत्रकाप्रमाणे १९ नोव्हेंबर रोजी प्रशासनाने ब्लेझर अंमलबजावणीबाबत तपासणी मोहीम राबविली. शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षण अधिकाºयामार्फत तपासणीचा अहवाल मागविला आहे. पण माळशिरस, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्याचे अहवाल येण्यास विलंब लागला. त्यामुळे ४८ तास उलटले तरी ब्लेझर घालणारे व न घालणाºया शिक्षकांची यादी निश्चित झालेली नाही. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत सर्व अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकाºयांकडे आले. त्यानंतर ही यादी झेडपी प्रशासन विभागाकडे देण्यात आली आहे.
आता या यादीप्रमाणे ब्लेझर न वापरलेल्या शिक्षकांना नोटिसा देण्याची यंत्रणा राबविण्यास वेळ लागणार आहे. जिल्ह्यात सुमारे साडेनऊ हजार प्राथमिक शिक्षक आहेत. यातील ४0 टक्के शिक्षकांनी ब्लेझरचा वापर केला नाही असे गृहित धरल्यास चार हजारांवर शिक्षकांना नोटिसा काढाव्या लागणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटिसांचे प्रिंटिंग व त्यावर सह्या करून संबंधीतांपर्यंत नोटिसा पोहोच करणे अशी मोठी यंत्रणा कामाला लागली आहे.
शिक्षक संघटनांच्या पावित्र्यामुळे अजूनही काही शिक्षकांना ब्लेझरचा निर्णय रद्द होईल असे वाटत आहे तर दुसरीकडे ६0 टक्के शिक्षकांनी ब्लेझर घेतल्यामुळे हा निर्णय मागे घेणेही उचित ठरणार नाही. त्यामुळे शाळेच्या शिस्तीचा विचार करता शिक्षकांना आता ड्रेसकोड व ब्लेझरची सवय करून घ्यायला लागणार आहे.
जिल्ह्यातील जवळजवळ २८00 शाळांचे तपासणी अहवाल येण्यास वेळ लागला आहे. जवळजवळ ६0 टक्के शिक्षकांनी ब्लेझरचा वापर केला आहे. उर्वरित शिक्षकांची यादी निश्चित करून पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन विभागाकडे देण्याचे काम सुरू आहे.गुरुवारी नोटिसा बजाविण्यात येतील.
- संजय राठोड, शिक्षणाधिकारी,प्राथमिक