कोरोना प्रतिबंधासाठी आता प्रथमोपचार पेटीत ऑक्सिमीटरची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:07 PM2020-08-19T14:07:44+5:302020-08-19T14:11:26+5:30
कोरोनाशी दोन हात : वाफारा यंत्र, तापमापकाचीही मागणी वाढली
सोलापूर : शरीरातील ऑक्सिजनची पातळी हा कोरोना तपासणीतील महत्त्वाचा घटक आहे. आता घरच्या घरी आपली आॅक्सिजन पातळी तपासण्याकडे लोकांचा कल वाढला आहे़ कोरोनाच्या धसक्याने लोकांमध्ये आरोग्यविषयक सतर्कता वाढली आहे़ त्यामुळे सद्यस्थितीत सोलापुरात ऑक्सिमीटरचा खप आणि वापर दणक्याने वाढला आहे़ प्रथमोपचार पेटीत आता या अशा साधनांची भर पडली आहे.
कोरोना आता उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला असल्याने लोकांमध्ये जागरुकता वाढली आहे़ स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मास्कबरोबर सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, वेपोरायझर खरेदी करू लागले आहेत़ मागणी वाढल्याने आता ऑक्सिमीटरची कमतरता भासू लागली आहे.
पल्स ऑक्सिमीटर हे खिशात बाळगता येण्यासारखे छोटे उपकरण आहे़ ते बोटाला लावून शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण मोजले जाते़ या प्रकारच्या चाचणीमध्ये रुग्णाला कोणतीही दुखापत किंवा वेदना होत नाहीत़ ही चाचणी करणे क ोणालाही सहज शक्य होते़ शरीरातील आॅक्सिजनची पातळी हा कोरोना तपासणीतील महत्त्वाचा भाग असल्याने आता त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ आॅक्सिमीटर या डिव्हाईसरुपी यंत्रात व्यक्तीचे बोट ठेवताच काही क्षणात त्यावर आॅक्सिजनचे प्रमाण आकड्यांमध्ये दिसते़ हे प्रमाण ९५ पेक्षा अधिक असणे हे उत्तम लक्षण आहे; मात्र ते ८० पर्यंत खाली आले असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे़त्याद्वारे नाडीचे ठोकेही मोजले जातात.
कोरोना प्रतिबंधासाठी अन्य खरेदीही
प्रथमोपचार पेटीमध्ये सर्दी, अंगदुखी, ताप, जुलाब यावरही प्रतिबंधात्मक औषधेही ठेवली जात आहेत़ आता खबरदारी म्हणून घरोघरी डिजिटल तापमापक , आॅक्सिमीटर तसेच वेपोरायझर (वाफारा यंत्र) घेतले जात आहे. नेबोलायझर अनेकांकडे आहे़ कप पातळ करण्यास त्याची मदत होते़ ज्यांच्याकडे अशा प्रकारची यंत्रे नाहीत त्यांनीही खरेदी सुरू केली आहे़
महिनाभरात पूर्वी के वळ तीन ऑक्सिमीटर विकले जायचे़ ऑक्सिमीटरबरोबरच वेपोरायझर आणि नेबोलायझरचीही मागणी वाढली आहे़ शहरात जवळपास ३०० औषध दुकाने आहेत़ या सर्व दुकानांमध्ये या साधनांची मागणी होत आहे़
- यासीर शेख
औषध विक्रेते