Maharashtra Election 2019; आता कोनच्या पक्षात तुमी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 01:14 PM2019-10-14T13:14:35+5:302019-10-14T13:14:42+5:30
रविंद्र देशमुख म्हातारीचं माहेर मोठं नावाजलेलं. तिचा बा लोकल बोर्डाचा सदस्य होता. लहानपणापासून तत्त्वाचं वातावरण बघितलेलं..पण लग्न होऊन शहरात ...
रविंद्र देशमुख
म्हातारीचं माहेर मोठं नावाजलेलं. तिचा बा लोकल बोर्डाचा सदस्य होता. लहानपणापासून तत्त्वाचं वातावरण बघितलेलं..पण लग्न होऊन शहरात आल्यापासून ती बिच्चारी राजकारणाच्या वातावरणापासून दूरच...पण निवडणुका आल्या की, राजकारणावर गप्पा मारण्याचा तिला भारी सोस. म्हातारं गचकल्यानंतर एकटी पडलेली आजी पेपर वाचण्यात आपला वेळ घालवायची.
देशाचं, राज्याचं राजकारण तिच्या अगदी मुखोद्गत. हल्ली तिची नजर कमजोर झाली अन् ऐकायला पण कमी येऊ लागलं. त्यामुळं एकटीच गल्लीतल्या कट्ट्यावर येऊन बसायची...पक्षाचा प्रचार करणाºया तिथल्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करायची..पोरांच्या गप्पांमध्ये तिला कोण कुठल्या पक्षात गेलंय?, कोण कुठून निवडणूक लढवतंय?, हे सगळं सगळं ठावूक..घाऊक पक्षांतरामुळे ती जाम वैतागूनही गेलीय... काय जमाना आलाय? आम्ही बी राजकारण बघितलं हाय की. पण असलं इकडून तिकडं उड्या मारणारे पुढारी नव्हते आमच्या काळात...म्हातारी त्रागा करून घ्यायची; पण नंतर अशा पुढाºयांची थट्टा करून सगळ्यांना पोट धरून हसायला भाग पाडायची..आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढल्यामुळे उमेदवार, नेते, कार्यकर्त्यांच्या एका पाठोपाठ एक पदयात्रा निघू लागल्या. सर्वच पदयात्रा मात्र कट्ट्यावर बसलेल्या म्हातारीला आवर्जून भेटून तिचा आशीर्वाद घेऊनच पुढं जायच्या.
रविवारचा सुटीचा दिवस असल्यामुळे घरातले पोरं-बाळं अन् कामधाम करणारी पुरुष मंडळी घरात होती. या गर्दीत आपली एक गर्दी नको म्हणून म्हातारी सकाळीच कट्ट्यावर येऊन बसली होती. रात्रीच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे कट्ट्यावर आलेलं ऊन खात म्हातारी निवांत बसून होती..गप्पा मारायला कोण येतंय का? या प्रतीक्षेत तासभर निघून गेला. तितक्यात वाजत गाजत पदयात्रा येऊ लागल्या तसा आजीबाईचा उत्साहही वाढू लागला...आता जेवणाच्या वेळेपर्यंत म्हातारी निश्चिंत झाली. तिचा वेळ चांगलाच कटणार होता...इतक्यात एक पदयात्रा आली. हात जोडून चालत चालत उमेदवार आले म्हातारीला पाहून वाकून नमस्कार केला तसा तिचा प्रश्न..आवो, कोनच्या पक्षात तुमी?..उमेदवारानं पार्टीचं नाव सांगितलं...मग मागल्या विलेक्शनला तुमी त्या पक्षात व्हतात? म्हातारीचा पुन्हा प्रश्न. उमेदवारानंही उत्तर दिलं..मग पार्टी का बदलली?..आजीच्या प्रश्नानं उमेदवाराला घाम फुटू लागला. कशीबशी उत्तरं देऊन उमेदवारानं तिथून काढता पाय घेतला..आजीबाईला नीट उत्तरं न मिळाल्यानं ती भलतीच संतापली होती.
कसलं राजकारण अन् कसलं काय? आमचा बाप बी राजकारण करत व्हतां की. पण तिकिटं मिळालं नाय म्हणून त्यो दुसºया पक्षात गेला नाय..ती पुटपुटू लागली. इतक्यात दुसरी पदयात्रा आली..म्हातारं माणूस दिसतंय म्हणून उमेदवार आशीर्वाद घ्यायला आला. पुन्हा आजीचे तेच प्रश्न...तिला मिळालेली उत्तरंही तीच. पण हा उमेदवार चाणाक्ष होता. तो आजीला ओळखत होता. त्यानं पदयात्रेतून वेळ काढून आजीबाईची फिरकी घेण्याचं ठरवलं... तो म्हणाला, आजीबाई तुम्ही नेहमी मला पल्याडच्या गल्लीतल्या कट्ट्यावर दिसायचा आता इकडच्या कट्ट्यावर कसं?.. म्हातारी म्हणाली धाकल्याकडं राहायला आलेय..का ओ तिकडं बरं होतं की? इकडं का आलात?..उमेदवारानं प्रश्न केला. म्हातारीच्या दडून राहिलेल्या भावनांना बांध फुटला अन् थोरल्या सुनेबरोबर बिनसल्याचं सांगून टाकलं. शिवाय थोरल्याचं दुकान बी कर्जात बुडाल्याचं म्हणाली अन् तिला रडू कोसळलं...उमेदवारानं तिला शांत केलं अन् म्हणाला, आजीबाई आमचं पण तसंच झालंय बघा. आता पक्षात आमच्यावर अन्याय झाला..त्या पक्षाकडंही आता मतदारानं पाठ फिरवलीय. मग आम्ही तिकडं का थांबायचं...म्हणून आम्ही या पक्षात..मग देणार ना आम्हाला मत?..आजीबाईला बदलतं राजकारण कळून चुकलं...मतासाठी तिचा होकार घेतला अन् उमेदवार पदयात्रेत पुढं चालू लागला.