आता वन विभाग म्हणतंय.. गाय-वासरावर हल्ला बिबट्यानं नव्हे तरसानं केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:36 AM2020-12-16T04:36:46+5:302020-12-16T04:36:46+5:30
करमाळा तालुक्यात ३ मार्चपासून आतापर्यंत सोलापूर वन विभागाने बिबट्या या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. ...
करमाळा तालुक्यात ३ मार्चपासून आतापर्यंत सोलापूर वन विभागाने बिबट्या या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत थर्मल ड्रोन, डॉग स्कॉड सर्चिंग, डेली पगमार्क डेटा ऑनालेसिस व ऑन स्पॉट कॉल व्हेरिफिकेशन आणि १४ गस्ती पथकांच्या माध्यमातून बिबट्याचे सर्च ऑपरेशन सुरू ठेवले आहे.
याचबरोबर कॅमेरा ट्रॅप, पिंजरे, बेशुद्धी पथक - दोन, शार्प शूटर टीम, एसआरपीएफ, पोलीस पथकांना पाचारण करण्यात आलेले आहे; मात्र जनावरांवर केलेला हल्ला बिबट्याने नव्हे तर तरस अशा प्राण्याने केला आहे असे सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले आहे.
लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व वन कर्मचारी अहोरात्र घरोघरी जाऊन लोकांमध्ये बिबट्या या वन्य प्राण्यांविषयी जनजागृती सुरू केले असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील एक आठवडा नरभक्षक बिबट्याविषयी लोकांमध्ये पसरलेले गैरसमज व अफवांचे निराकरण करण्याचे प्रयत्न वन विभाग करत आहे. बऱ्याच ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे म्हणून तरस, कुत्रे व इतर वन्य प्राण्यांचे ठसे अथवा चित्रफिती या प्रसार मध्यमांमध्ये येत आहेत. लोकांनी इंटरनेटच्या माध्यमातून बिबट्याचे ठसे व त्याची माहिती घेत जुन्या व खोट्या चित्रफिती यांची शहानिशा करावी व नंतरच विश्वास ठेवावा. सोमवारी भिवरवाडी येथील गायीवर झालेला हल्ला हा तरस या वन्य प्राण्याने केला असून, ते तेथे मिळालेल्या केसाच्या सॅम्पल व पायांच्या ठशांवरून सिद्ध होते. लोकांनी अफवांवर विश्वासू ठेवू नये. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी; अन्यथा ते कारवाईस पात्र ठरतात, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
---------