आता पाठदुखी/कंबरदुखी विसरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:27 AM2021-09-15T04:27:13+5:302021-09-15T04:27:13+5:30
१) कंबरेच्या मणक्याच्या ठिकाणी हाडांवर उंचवटे निर्माण होणे, मणक्यांचा संधिवात, पाठीच्या कण्याचे फ्रॅक्चर होणे, पाठीच्या कण्यात ट्युमर होणे, मणक्यांमधील ...
१) कंबरेच्या मणक्याच्या ठिकाणी हाडांवर उंचवटे निर्माण होणे, मणक्यांचा संधिवात, पाठीच्या कण्याचे फ्रॅक्चर होणे, पाठीच्या कण्यात ट्युमर होणे, मणक्यांमधील चकतीचा काही भाग बाहेर येणे, चुकीच्या पद्धतीने उभे राहणे किंवा बसणे यापैकी कोणत्याही कारणाने सायटिका नावाच्या मज्जातंतूवर दाब पडल्याने नितंबापासून मांडीच्या मागच्या भागातून पायाच्या खालपर्यंत चमक निघणे, मुंग्या येणे, कधी-कधी पाय बधिर होणे, आग होणे ही लक्षणे दिसतात. गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात काही स्त्रियांना सायटिकाचा त्रास होतो. बाळाचे वजन सांभाळण्यासाठी बसण्याची, उभे राहण्याची ढब बदलते, त्यामुळेच हा त्रास त्यांना होतो.
स्पीयनलिस्टेनसिस - मज्जारज्जू पाठीच्या कण्यातून मेंदूपासून माकड हाडापर्यंत मणक्यांच्या पोकळीतून जातो. या पोकळीला मेरुनाल म्हणतात. प्रत्येकांमध्ये मेरुनालचा आकार वेगळा असतो. कमी घेर असणाऱ्यांना मेरुनाल संकोचाचा त्रास होतो. काही जणांच्या मेरुनालच्या डाव्या-उजव्या बाजूला मज्जातंतू बाहेर पडण्यासाठी जे छिद्र असते तेच अरुंद असते. त्यांनासुद्धा याचा त्रास होतो. विशेषत: ज्या संघातून बाहेर पडलेले मज्जातंतू पायापर्यंत गेलेले असतात. त्या जागी चकतीचा काही भाग अचानक बाहेर आला, मणक्याच्या हाडामध्ये गाठ आली किंवा मणक्यांमध्ये ऱ्हासजन्य बदल झाले तर छिद्र अरुंद होते. त्यामुळे मज्जातंतूवर दाब पडतो. एखादा मणका त्याच्या जागेपासून सरकला तरीसुद्धा स्टेनॉसिसची लक्षणे दिसतात. स्पायनल स्टेनसिस बहुतकरून कंबरेच्या मणक्यांमध्ये होतो. हा त्रास कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो. कारणे कोणतीही असली तरी लक्षणे मज्जारज्जूवर किंवा मज्जातंतूवर दाब पडल्याची असतात.
लक्षणे - मेरुनालचा संकोच झाला तर वेदना होतात, उभे राहिल्यानंतर पायाला मुंग्या येतात. पाय बधिर होतात, चालताना, वाकताना त्रास होतो, बसल्यानंतर, मांडी घातल्यानंतर, पुढे वाकल्यानंतर मेरुनाल रुंद झाल्यामुळे लक्षणे कमी झाल्यासारखी वाटतात.
स्पाँडिलो-लिस्थेसिस - कधी कधी वरचा मणका खालच्या मणक्यापेक्षा पुढे सरकतो त्याला स्पाँडिलो-लिस्थेसिस म्हणतात.
कारणे - अशक्त पणामुळे पाठीच्या कण्याला आधार देणाऱ्या कमानीमध्ये दोष असेल किंवा फ्रॅक्चर झाले तर त्रास होतो. जिम्नास्टिक, ॲथलेटिक, वजन उचलणे, फुटबॉल अशा खेळांमुळे असे फ्रॅक्चर होऊ शकते. वयोमानानुसार फॅसेट सांध्याची झीजमुळे मणका सरकू शकतो.
आयुर्वेद उपचार - मणक्यांच्या अनेक त्रासांमध्ये ऑपरेशन करणे टाळून आयुर्वेद उपचारासाठी आलेली व बरे झालेले अनेक रुग्ण आहेत. आयुर्वेदात पंचकर्मातील वेगवेगळ्या औषधी काढ्यांचे व तेलांचे बस्ती तसेच ज्या मणक्याचा त्रास असेल त्यावर केरळीय वनस्पती सिद्ध तेलाची कटीबस्ती देणे, स्नेहन-बाष्पस्वेदन, पिंडस्वेदन व पाठीचे कंबरेचे दुखणे व मुंग्या कमी करण्यासाठी पोटात घ्यावयाची औषधे या सर्वांची जोड दिल्यास कोणत्याही साईड इफेक्टशिवाय अनेक रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्याची नोंद आहे.
- डॉ. शिवरत्न शेटे