सामाजिक वनीकरण; आता संस्थांच्या मदतीने नऊ लाख वृक्षारोपणाचा केला संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 12:31 PM2020-07-08T12:31:58+5:302020-07-08T12:33:36+5:30
लॉकडाऊनमुळे शासन निधी कपात, हरित महाराष्ट्र मोहिमेला बळ देण्याचा प्रयत्न
सोलापूर : पर्यावरण संतुलित हरित महाराष्ट्र करण्यासाठी दरवर्षी राज्यात राबविण्यात येणाºया वृक्षलागवड अभियानाच्या निधीत यंदा कपात झाली. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हरित महाराष्ट्र अभियानाला लॉक बसण्याची शक्यता आहे. यंदा ९ लाख रोपं तयार असून जिल्ह्यातील ग्रामपंचायती, सामाजिक संस्थांच्या मदतीने हरित महाराष्ट्र मोहिमेला बळ देण्याचा प्रयत्न सामाजिक वनीकरणाने चालवला असल्याची माहिती उपविभागीय वन अधिकारी सुवर्णा झोळ-माने यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
महायुती सरकारने मागील पाच वर्षांत राज्यात शतकोटी वृक्षलागवड योजना राबविली. त्याच पद्धतीने पर्यावरण संतुलनासाठी ‘वृक्षलागवड योजना माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र’ या नावाने योजना सुरू ठेवण्याचा निर्णय वनमंत्री संजय राठोड यांनी घेतला. मात्र कोरोनाने राज्यात पाय पसरले आणि ही योजना कार्यान्वित होता होता थांबली.
१ जुलैपासून एसआरपी कॅम्प, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाला सुरुवात झाली. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यावर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सामाजिक वनीकरणाशी संपर्क साधला आहे. त्यांना मोफत विविध प्रकारची रोपं पुरवली जात आहेत. तसेच याच काळात एनटीपीसी आणि पाणी फाउंडेशनसह अनेक संस्थांनीही वृक्षलागवड हाती घेतली आहे.
यंदाही ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांना कडूलिंब, चिंच, जांभूळ, सीताफळ अशी विविध मिक्स रोपं पुरवली जात आहेत. मात्र काही शेतकºयांनी बांबूकडे कल ठेवला आहे. जुलै, आॅगस्ट महिन्यात दरवर्षी मागणी वाढते. सध्या माळशिरस, मोहोळ, उत्तर, दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातून रोपं नेऊन लागवडी करण्याला प्रतिसाद मिळतोय.
शतकोटी वृक्षलागवड अभियानासाठी वर्षभर तयारी चालायची. या वर्षी निधीत कपात झाली आहे. मात्र जिल्ह्यात १७ रोपवाटिकांच्या माध्यमातून ९ लाख रोपे तयार ठेवली आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे फिल्डवरील कामे रखडली असली तरी एमआरजीएस (महात्मा गांधी राष्ट्रीय अभियान) मधून ही कामे सुरू ठेवली आहेत.
- सुवर्णा झोळ-माने, उपविभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण