आता सोलापुरातील रेल्वे स्टेशन, एस. टी. स्टँडवर कोरोना चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 01:15 PM2021-03-30T13:15:58+5:302021-03-30T13:16:05+5:30
बाहेरगावांहून येणाऱ्यांसाठी ७२ तासांपूर्वीचा अहवाल दाखविणे बंधनकारक
सोलापूर : कोरोनाचा शहरातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगळवारपासून रेल्वे स्टेशन आणि एस. टी. स्टँडवर येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांनी ७२ तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणी अहवाल दाखवावा. अहवाल नसेल तर चाचणी करणे बंधनकारक आहे, असे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कडक निर्बंध लादायला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रेल्वे स्टेशन आणि एस. टी. स्टँडवर कोरेाना चाचणीची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रवाशांनी या ठिकाणी चाचणी करणे बंधनकारक असेल. एखादा प्रवाशी बाहेरगावातून आला. त्याच्याकडे ७२ तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल असेल तर त्याला चाचणी करायची आवश्यकता नाही.
दरम्यान, शहरातील सर्व भाजी मंडईमधील भाजी विक्रेत्यांना कोरोना चाचणी करून घेण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. रविवारपर्यंत ३५० भाजी विक्रेत्यांची तपासणी केली. त्यातील १८ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अद्यापह अनेक भाजीविक्रेत्यांनी चाचणी केलेली नाही. त्यांनी तातडीने जवळच्या आरोग्य जाऊन चाचणी करून घ्यावी. अहवाल सोबत ठेवावा. तपासणीवेळी अहवाल नसेल तर दंडात्मक कारवाई हेाईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
आता दुकानांची तपासणी होणार
शहरातील सर्व दुकानदारांनी कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. दुकानांत चाचणी अहवाल ठेवावा. मंगळवारपासून महापालिकेचे पथक विविध दुकानांची तपासणी करणार आहे. दुकानदारांकडे अहवाल नसेल तर दुकान सील करण्यात येईल. दंडात्मक कारवाई हेाईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.