आता सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी घेणार भाभा अणु संशोधन केंद्रात प्रशिक्षण अन् संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 04:59 PM2021-11-12T16:59:38+5:302021-11-12T17:00:20+5:30
भाभा अणु संशोधन केंद्र व सोलापूर विद्यापीठात पंधरा प्रोजेक्टसाठी सामंजस्य करार
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि मुंबई येथील भारत सरकारच्या भाभा अणु संशोधन केंद्र यांच्यात विविध 15 प्रोजेक्टसाठी सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या कार्यालयात सामंजस्य कराराची प्रक्रिया पार पडली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आकृती प्रोजेक्ट विभाग आणि भाभा अणु संशोधन केंद्राच्या आकृती टेक्नॉलॉजी विभागाच्या माध्यमातून 15 प्रोजेक्टसाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या सामंजस्य करारावर भाभा अणु संशोधन केंद्राच्या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी स्मिता मुळे आणि विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यावेळी विद्यापीठाच्या आकृती प्रोजेक्टच्या प्रमुख डॉ. अंजना लावंड या उपस्थित होत्या.
या पंधरा सामंजस्य करारामुळे विद्यार्थी आणि अभ्यासकांना येणाऱ्या काळात भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रशिक्षण घेण्याची व संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. या पंधरा प्रोजेक्टमध्ये प्रामुख्याने कृषी आणि ग्रामीण भागाशी विषय जोडली गेली आहेत. त्यात नॅनोटेक्नॉलॉजी, विविध फळांचे रेडिशनद्वारे संरक्षण, सोलार प्रकल्प, नैसर्गिक खत निर्मिती, केळी टिशू कल्चर, हळदीचे विविध प्रयोग, माती परीक्षण, पाणी शुद्धीकरण यंत्र, निमचा खतासाठी उपयोग इत्यादी विषयांवर करार झालेला असून याचा विद्यार्थी व शिक्षकांना संशोधन, प्रशिक्षण व नोकरीसाठी उपयोग होणार असल्याचा विश्वास कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.