आता सोलापूरात उघड्यावर कचरा टाकल्यास होणार दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:51 PM2018-06-15T12:51:21+5:302018-06-15T12:51:21+5:30
कोंडाळे हटविणार, दोन पाळ्यात घंटागाड्या धावणार
सोलापूर : घंटागाड्या दररोज दोन पाळ्यात घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा संकलित करणार आहे. त्यामुळे शहर कचरामुक्त करण्यासाठी कचरा कोंडाळे हटविण्यात येणार आहेत. जर यापुढे कचरा कोंडाळ्याच्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकताना कोणी सापडले तर अशा नागरिकांना दंड किंवा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त त्रिंबक ढेंगळे—पाटील यांनी गुरूवारी येथे बोलताना दिली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्यावतीने ओला कचरा व सुका कचरा व्यवस्थापनासंदर्भात सर्व विभागीय अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य नितीक्षक, घंटागाडीवरील वाहनचालक व बिगारी यांच्यासाठी हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्वच्छता अभियानात सहभागी असलेल्या या सर्व कर्मचाºयांना उपायुक्त ढेंगळे—पाटील यांनी जून अखेर शहर कचरामुक्त करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. यासाठी दोन पाळ्यात २२५ घंटागाड्या धावणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आणखी ३0 घंटागाड्या लवकरच दाखल होणार आहेत. प्रत्येक घंटागाडीला जीपीएस यंत्रणा असून गाडी कोठे धावत आहे, याची माहिती महापालिका अधिकारी, नगरसेवकांना होण्यासाठी मोबाईल अॅपचा उपयोग केला जाणार आहे.
यावेळी स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक नरेंद्र काटीकर यांनी घनकचरा व्यवस्था कशी करावी याची माहिती दिली. टाटा मोटर्स कंपनीचे वितरक महेश पवार यांनी घंटागाड्यांच्या रचनेबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे यांनी केले व त्यांनी नवीन घंटागाड्यांवरील वाहनचालक व मदतनीस यांनी ओला कचरा व सुका कचरा संकलन करण्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी विभागीय अधिकारी, घनकचरा विभाग प्रमुख दीपक पवार, बाहुबली भूमकर, मुख्य सफाई अधीक्षक संजय जोगधनकर, गिरीश तंबाके, तेजस शहा, आरोग्य निरीक्षक, घंटागाडी चालक, मदतनीस उपस्थित होते.
उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी या कार्यशाळेचा हेतू व उद्दिष्टे स्पष्ट करताना म्हटले की, सोलापूर शहर कचरामुक्त करणे, सोलापूर शहर कचरा कोंडाळेमुक्त बनविणे, १००% घरोघरी जाऊन ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरणानुसार गोळा करणे, प्लॅस्टिकमुक्त शहर बनविणे तसेच सोलापूर स्मार्ट सिटी ए.बी.डी. एरिया सर्व विभागीय अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक तसेच घंटागाडीवरील ड्रायव्हर व सहाय्यक यांनी करावयाच्या कामासंदर्भात सविस्तर माहिती देत असताना घंटागाडी रुटमॅपनुसारच घंटागाडी फिरवणे, प्रत्येक घरासमोर/ व्यापारी दुकाने/व्यापारी गाळे इत्यादी ठिकाणी जाऊन कचरा घेणे, नागरिकांना कचरा घंटा गाडीत टाकण्यास गाडीबरोबर असणाºया बिगारी सेवकांनी मदत करावी, आपल्याला देण्यात आलेली हद्द सोडून गाडी कुठेही फिरवायची नाही, सर्व घंटागाडीवर जीपीएस प्रणाली बसविण्यात आलेली आहे, याचीही बारीक (सूक्ष्म) माहिती या वेळी दिली.