आता सोलापूरातील बँकामध्ये होणार आधार नोंदणी, ११ बँकांमध्ये आधार नोंदणी सुरू उर्वरित २९ ठिकाणी महिनाअखेर होणार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:31 PM2018-02-15T12:31:31+5:302018-02-15T12:34:04+5:30
नव्याने आधार नोंदणी करणे आणि व्यक्तिगत माहिती अपडेट करण्याच्या कामास आणखी गती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ४० बँकांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १५ : नव्याने आधार नोंदणी करणे आणि व्यक्तिगत माहिती अपडेट करण्याच्या कामास आणखी गती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ४० बँकांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील ११ बँक शाखांमध्ये आधार केंद्र सुरू झाले आहे. उर्वरित २९ ठिकाणी २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू करण्यात यावेत, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांनी बँकेच्या व्यवस्थापकांची बैठक घेतली. यावेळी युआयडीएचे अभिषेक पांडे, महा-ई-सेवाचे जिल्हा समन्वयक शशिकांत इगवे आदी उपस्थित होते. स्टेट बँक आॅफ इंडियासह इतर बँकांनी आधार नोंदणी केंद्र सुरू केले आहे. अद्यापही इतर काही बँकांनी या कामाला सुरुवात केलेली नाही. त्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत एजन्सीमार्फत काम सुरू करावे, अशा सूचना तेली यांनी केल्या.
-------------------
येथे होणार सुरू
- बँक, अॅक्सिस बँक : कन्ना चौक शाखा. बँक आॅफ बडोदा. बँक आॅफ इंडिया : मंगळवेढा, पंढरपूर, अकलूज, माळशिरस, माढा, सांगोला, रेल्वेलाइन सोलापूर. बँक आॅफ महाराष्ट्र : अक्कलकोट, बार्शी, अकलूज, जुळे सोलापूर. कॅनरा बँक : चाटी गल्ली, सेंट्रल बँक आॅफ इंडिया : बार्शी, बाळीवेस सोलापूर. फेडरेल बँक. एचडीएफसी : होटगी रोड, मुरारजी पेठ. आयसीआयसीआय बँक : सोलापूर, आयडीबीआय बँक : सोलापूर, इंडस बँक : माढा, इंडियन ओयॉसीस : रेल्वेलाइन सोलापूर, पंजाब नॅशनल बँक : कस्तुरबा मार्केट सोलापूर. स्टेट बँक आॅफ इंडिया : मार्केट यार्ड, मंगळवेढा, न्यू पाच्छा पेठ, भुसार पेठ, रेल्वेलाइन, नातेपुते, माढा, कोळे, विजापूर रोड सोलापूर, पंढरपूर, करमाळा. सिंडिकेट बँक : सैफुल, युनियन बँक आॅफ इंडिया : कुंभार वेस.
---------------
सर्वांना मिळेल सोय
- बँक खात्यासाठी आधार जोडणी आवश्यक आहे. आधार क्रमांकाला मोबाइल क्रमांक वगैरे माहिती जोडलेली नसल्याने अडचणी येत आहेत. यावर तोडगा म्हणून बँकांमध्येच आधार केंद्र सुरू करण्यात येत आहेत. हे केंद्र खासगी एजन्सीमार्फत चालविले जाणार असल्याने केवळ बँकेचा खातेदार नव्हे तर सर्वच ग्राहकांना मदत करायची आहे. बँकांमधील एजन्सीने ग्राहकांना आधार नोंदणी अथवा माहिती अपडेट करण्याबाबत असहकार्य केल्यास युआयडीएकडे तक्रार करता येईल, असे संजय तेली यांनी सांगितले.