आता सोलापुरातील पाण्याची तपासणी मोबाईल अॅपद्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:18 PM2019-05-03T13:18:14+5:302019-05-03T13:20:17+5:30
जिल्हा परिषदेचा नवा प्रयोग; जैविक आणि रासायनिक पदार्थाचे प्रमाण शोधणार
सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यामध्ये विरघळलेल्या रासायनिक व जैविक घटकांची तपासणी मोबाईल अॅपद्वारे करण्यात येत आहे. जिल्ह्यात असे १३ हजार ४२३ पाण्याचे साठे मे अखेर तपासण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध होणाºया पाणी स्रोतांची दरवर्षी अशी तपासणी केली जाते. आता ही तपासणी जलदगतीने होण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील १३ हजार ४२३ पाण्याच्या स्रोतांचे असेट मॅपिंग यापूर्वीच करण्यात आले आहे. आता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळेमार्फत या पाणी स्रोतांची जिओफेनसिंग मोबाईल अॅपद्वारे रासायनिक तपासणी सुरू करण्यात आली आहे.
३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील ५ हजार ६६२ स्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. गावांमध्ये लोकांना पिण्यासाठी ज्या स्रोतांद्वारे पाणी उपलब्ध केले जाते, त्या स्रोतांचीही तपासणी करण्यात येत आहे. यासाठी पाण्याचे नमुने घेण्याची जबाबदारी ग्रामसेवक व जलसुरक्षकांवर देण्यात आली आहे. प्रयोगशाळेकडे आलेल्या पाणी नमुन्याची रासायनिक व जैविक तपासणी केली जाते. यामध्ये पाण्यात विरघळलेल्या रासायनिक व जैविक पदार्थांची तपासणी करून पाणी पिण्यालायक आहे की नाही, हे पाहिले जाते. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या प्रदूषणामध्ये पाण्यात रासायनिक घातक द्रव्ये येऊ शकतात. आता पावसाळ्याच्या तोंडावर पाण्याचे असे परीक्षण केल्याने धोके टळू शकतात. जैविक तपासणीत पाण्यात असणारे आवश्यक घटक आहेत की नाहीत, हे पाहिले जाते. यामध्ये जमिनीतील खनिजाचे विरघळलेले प्रमाण, क्षार आदी बाबींचा समावेश आहे.