आता एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना शुभ्र शिधापत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:22 AM2021-02-10T04:22:20+5:302021-02-10T04:22:20+5:30
सांगोला शहर व तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र अशा सर्वच प्रकारच्या शिधापत्रिकांच्या तपासणीची शोध मोहीम ...
सांगोला शहर व तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र अशा सर्वच प्रकारच्या शिधापत्रिकांच्या तपासणीची शोध मोहीम सुरू आहे. सध्या श्रीमंत वर्ग शिधापत्रिकेवरील कमी उत्पन्नामुळे या योजनांचे लाभार्थी ठरत आहेत. राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचारी, कामगार यांच्या शिधापत्रिका तत्काळ अपात्र ठरवून त्या शुभ्र करण्यात येणार आहेत. शासनाच्या या शोध मोहिमेमुळे अपात्र होणाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. या मोहिमेंतर्गत सांगोला तालुक्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची तपासणी होणार आहे.
नमुना फॉर्म वाटप करणार
त्या त्या भागातील रास्तभाव दुकानातून नागरिकांना नमुना फाॅर्म वाटप करण्यात येणार आहे. या फाॅर्ममध्ये असलेली माहिती शिधापत्रिकाधारकांना सत्य स्वरूपात द्यावी लागणार आहे. शिधापत्रिकाधारकांना ते ज्या भागात राहत आहेत, त्यासाठी निश्चित केलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, स्थलांतरित व्यक्ती, मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे ही वगळण्यात येणार आहेत.
कोट :::::::::::::::::::
शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असल्यास ती वितरित करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. शिधापत्रिका धारकांना भाडे पावती, निवासस्थानाच्या मालकीबाबतचा पुरावा, गॅस जोडणी क्रमांक, बँक पासबुक, वीज बिल, टेलिफोन-मोबाईल बिल, ड्रायव्हिंग परवाना, कामाचे ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड आदी पुरावे द्यावे लागणार आहेत.
- अभिजित पाटील
तहसीलदार, सांगोला