एनयुएचएम घोटाळा :गाडी भाड्याने लावण्यासाठी गुडेवार यांची मारली बोगस सही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:55 PM2018-12-31T12:55:59+5:302018-12-31T12:58:36+5:30
सोलापूर : महापालिकांतर्गत असलेल्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एनयुएचएम) कार्यालयासाठी गाडी भाड्याने लावण्यासाठी मंजुरी घेण्यात आलेल्या पत्रावर चक्क तत्कालीन ...
सोलापूर : महापालिकांतर्गत असलेल्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एनयुएचएम) कार्यालयासाठी गाडी भाड्याने लावण्यासाठी मंजुरी घेण्यात आलेल्या पत्रावर चक्क तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बोगस सही मारण्यात आली आहे.
पुणे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी याबाबत आरोग्य संचालकांकडे केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघड झाला आहे. शहरी आरोग्य अभियानाच्या कार्यालयासाठी भाड्याने लावण्यात आलेल्या गाडीचा विषय यापूर्वीच वादग्रस्त ठरला आहे. या प्रकरणाची चौकशी झाली व त्या अनुषंगाने यासंबंधी असलेल्या दोघा महिला डॉक्टरांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या गाडीसाठी अदा करण्यात आलेले भाडे संबंधित डॉक्टरांकडून वसूल करण्याचे आदेश झाले आहेत असे असताना आता तत्कालीन आयुक्त गुडेवार यांनी आरोग्य संचालकांकडे केलेल्या तक्रारीवरून वेगळेच प्रकरण बाहेर आले आहे.
गाडी भाड्याने लावण्यासाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर करण्यात आलेली सही माझी नसून कोणीतरी बोगस सही मारल्याचे गुडेवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच गंभीर बनले आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यालयाच्या कामासाठी भाड्याने वाहन उपलब्ध करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. निविदेद्वारे हे वाहन उपलब्ध करावे तत्कालीन आरोग्य अधिकाºयांनी १६ जून २0१४ रोजी आयुक्तांकडे एक प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला.
या प्रस्तावात या कार्यालयासाठी भाड्याने घेण्यात आलेल्या गाडीसाठी बजेट तरतुदीप्रमाणे मागील वर्षाप्रमाणेच भाडे मंजूर करावे. जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर २0१४ या तीन महिन्यांसाठी ७५ हजार भाडे अदा करण्यास कार्योत्तर मान्यतेचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर २१ जून २0१४ रोजी स्वाक्षरी केली आणि त्याच तत्कालीन आयुक्त गुडेवार यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याची सही आहे. ही सही मी केलीच नाही, असे गुडेवार यांनी तक्रारीत नमूद केल्यामुळे या प्रकरणाचे गौडबंगाल वाढले आहे.
मास्टर माइंड कोण ?
बोगस क्रमांकाची आरोग्य विभागाची गाडी अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर तत्कालीन आयुक्त विजयकुमार काळम यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यात हा प्रकार उघडकीला आला. आरोग्य अधिकाºयांनी संगनमत करून बोगस प्रस्तावाद्वारे गाडीभाडे लाटल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित भाडे वसुलीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आता तत्कालीन आयुक्त गुडेवार यांची सही बोगस असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य संचालक काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.