पोटनिवडणुकीनंतर कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे; रोज २००० लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:22 AM2021-04-24T04:22:29+5:302021-04-24T04:22:29+5:30
पंढरपूर : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीमुळे वाढलेली रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांना लसीकरण करून रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणता येईल. ...
पंढरपूर : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीमुळे वाढलेली रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांना लसीकरण करून रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणता येईल. त्यामुळे दररोज २००० कोविडची लस नगरपरिषदेला मिळावी, अशी मागणी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केली आहे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मिटिंग आयोजित केली होती. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले पक्षनेते गुरुदास अभ्यंकर सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले.
पंढरपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सध्या अस्तित्वात असलेली आरोग्य सुविधा (कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल, दवाखाने) अपुरी पडत असून त्यांच्यावर खूप ताण पडत आहे. त्यामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन हे देखील अपुरे पडत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन मृत्यूची प्रमाण वाढले आहे. पंढरपूर शहरातील नागरिकांना होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रित होण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांना रेमडेसिविर व ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात यावा तसेच पंढरपूर शहराची लोकसंख्या १ लाख असून शासनाकडून सात दिवसांतून फक्त २०० ते ३०० कोविड-१९ च्या लसीचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने स्थापन केलेल्या लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन नागरिकांना लस न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे व दररोज लसीकरण केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे तरी शहराची लोकसंख्या विचारात घेता व नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीमुळे वाढलेली रुग्णांची संख्या विचारात घेता दररोज २००० कोविडची लस नगरपरिषदेला मिळावी जेणेकरून नागरिकांना लसीकरण करून रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणता येईल, अशी मागणी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केली आहे.