सोलापुरातील 'कोरोना' बाधितांची संख्या ३०० पार; आज ३१ रुग्णांची भर, दोघांचा मृत्यू
By appasaheb.patil | Published: May 13, 2020 07:34 PM2020-05-13T19:34:49+5:302020-05-13T19:43:51+5:30
आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू; २०९ रुग्णांवर उपचार सुरू
सोलापूर : सोलापुरातील 'कोरोना' बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सोलापूरात बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या आज ३१ नं वाढून ३०८ इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या आज २ ने वाढून २१ वर पोहोचली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आत्तापर्यंत ३५०२ जणांची कोरोना स्वॅब चाचणी घेण्यात आली. यापैकी ३३६६ अहवाल प्राप्त झाले. यात ३०५२ निगेटिव्ह तर ३०८ पॉझिटिव्ह आहेत. आज एका दिवसात १२९ अहवाल प्राप्त झाले यात ९८ निगेटिव्ह तर ३१ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात १५ पुरूष आणि १६ महिलांचा समावेश आहे.
आज मृत पावलेल्यांमध्ये ६० वर्षीय व्यक्ती गुरूनानक नगर परिसरातील पुरूष आहे. ११ रोजी सायंकाळी या व्यक्तीचा मृत्यू झाला; तर दुसरी व्यक्ती इंदिरा वसाहत भवानी पेठ येथील ७२ वर्षीय पुरूष आहे. या व्यक्तीचा मृत्यू १२ मे रोजी झाला.
आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या ३०८ मध्ये १७३ पुरूष तर १३५ महिलांचा समावेश आहे. तर मृत २१ पैकी ११ पुरूष आणि १० महिलांचा समावेश आहे. रूग्णालयातून बरे होवून गेलेल्यांची संख्या ८४ असून यात ५५ पुरूष तर २९ महिलांचा समावेश आहे.