तीन हजारांवर आकडा गेल्याने मनपा करणार २५ हजार जणांची अँटीजेन तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:16 AM2020-07-15T11:16:05+5:302020-07-15T11:18:11+5:30
आगामी दहा दिवसाच्या संचारबंदी काळात सोलापूर महानगरपालिकेने केले नियोजन
सोलापूर : महापालिका क्षेत्रात गेल्या चार महिन्यात ३ हजार ३३७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. या रुग्णांची आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची व्यवस्था करण्यात महापालिकेची आणि खासगी रुग्णालयांची दमछाक झाली. आगामी दहा दिवसांत महापालिकेने २५ हजार अँटीजेन टेस्टचे नियोजन केले आहे. यातून पॉझिटिव्ह निघणारे रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची व्यवस्था करण्यात महापालिकेला यश येईल का, असा प्रश्न नगरसेवकांसह नागरिकही उपस्थित करीत आहेत.
१६ जुलैच्या रात्रीपासून होणाºया दहा दिवसांच्या संचारबंदीत शहरातील नागरी आरोग्य केंद्रांमधून २५ हजार अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहेत. गेल्या चार महिन्यांत शासकीय आणि खासगी लॅबमधून १५ हजार ९५० जणांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. यातून तीन हजार ३३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या व्यक्तींच्या संपर्कातील ९ हजार ६७१ जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील ७ हजार ६०७ व्यक्तींना घरी सोडण्यात आले.
कोरोनाबाधित आणि संपर्कातील व्यक्तींच्या क्वारंटाईनचा भार महापालिकेवरच आहे. यासाठी दहा इमारतींमध्ये रुग्णांच्या मुक्कामासह जेवणाची, औषधोपचाराची व्यवस्था करण्यात येत आहे. परंतु, क्वारंटाईन सेंटरमधील स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात. जेवण वेळेवर मिळत नाही. डासांचा उपद्रव होतो, अशा तक्रारी रुग्णांकडून केल्या जातात. आता २५ हजार टेस्ट केल्यानंतर महापालिकेची क्वारंटाईन सेंटर्स नव्याने दाखल होणाºया रुग्णांचा भार सोसतील का, असा प्रश्न एमआयएमचे गटनेते रियाज खरादी, नगरसेवक विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे आदींनी उपस्थित केला. सध्याचे दिवस पावसाळ्याचे आहेत. या काळात क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्याची, जेवणाची आणि चांगल्या पाण्याची व्यवस्था असायलाच हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
लोकसंख्येपैकी दीड टक्के नागरिकांची टेस्ट
शहरात १३ जुलैअखेर १५,९५० जणांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. यातून ३,३३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यातील ३०६ जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात १३ जुलैअखेर ६,५०२ जणांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. यातून ८९८ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ३८ जणांचा मृत्यू झाला होता.
भांडवली कामांप्रमाणे क्वारंटाईन सेंटरची बिले थकली
महापालिकेच्या भांडवली निधीतून विकासकामे करणाºया मक्तेदारांची १०० कोटींची बिले महापालिकेने थकवली आहेत. हे मक्तेदार आजही पालिकेत हेलपाटे घालतात. लॉकडाऊनमुळे महापालिकेचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले आहे. त्यात क्वारंटाईन सेंटरचा भारही पालिकेवरच आला आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये गेले चार महिने जेवणाची व्यवस्था करणारे महेश धनवानी आणि मनोज शहा या मक्तेदारांचे चार महिन्यांचे बिल जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने थकवले. त्यामुळे मक्तेदारांनी २० जुलैपासून जेवण पुरविण्यास नकार दिला आहे. प्रतिबंधित क्षेत्रात बॅरिकेड्स करणाºया मक्तेदारांची बिलेही थकवली आहेत.
क्वारंटाईन सेंटरमध्ये जादा खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू आहे. तिथे चांगल्या व्यवस्था मिळतील, यासाठी प्रयत्न करू. जेवण पुरविणाºया मक्तेदारांनी काम करण्यास नकार दिला असला तरी नव्याने काही मक्तेदार नेमण्याचे नियोजन सुरू आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- संदीप कारंजे,
नगर अभियंता, महापालिका
असे आहे नियोजन
सध्या सात क्वारंटाईन सेंटर्समधून तीन हजार खाटांची व्यवस्था आहे. आगामी आठ दिवसांत आणखी इमारती ताब्यात घेण्याचे नियोजन केल्याचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी सांगितले. ही व्यवस्था पुरेशी असेल का, याबद्दलही नगरसेवकांना शंका आहे. नव्या सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांची व्यवस्था करण्यात येणार आहे.