बाळे, दाराशा, रामवाडी, शेळगी, सोरेगावात आढळले ११ कोरोनाचे रुग्ण; ५० वर्षाच्या आतील रुग्ण वाढले
By दिपक दुपारगुडे | Published: April 6, 2023 06:53 PM2023-04-06T18:53:28+5:302023-04-06T18:53:43+5:30
सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
सोलापूर : सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ११ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहरातील रुग्णसंख्या आता ३६ वर पोहोचली आहे. दरम्यान, बुधवारी १८० रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी १६९ जणांचा अहवाल निगेटिव्ह तर ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बाळे, दाराशा, नई जिंदगी, रामवाडी, शेळगी, सोरेगाव येथे कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. ० ते १५ वयोगटातील ३, १६ ते ३० वयोगटातील १, ३१ ते ५० वयोगटातील ४, ५१ ते ६० वयोगटातील २ व ६० वर्षापुढील १ रुग्णाचा समावेश आहे. काल बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १५ एवढी आहे. गुरुवारच्या अहवालात मृत व्यक्तीची नोंद झाली नाही. आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या ३४ हजार ६९६ एवढी आहे तर मृतांची संख्या १ हजार ५१९ एवढी आहे. रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्यांची आतापर्यंतची संख्या ३३ हजार १४१ एवढी आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नको, कोणताही आजार अंगावर काढू नका, लक्षणे दिसल्यास जवळच्या नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना दाखवा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.