सोलापुरातील रेल्वे प्रवाशांची संख्या घटली; रोज होतात दीडशे तिकीटं रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 01:45 PM2021-04-22T13:45:54+5:302021-04-22T13:46:05+5:30
रेल्वे स्थानक: वाढत्या कोरोनाचा परिणाम जाणवतोय
सोलापूर : वाढत्या कोरोनामुळे राज्यात कडक संचारबंदीचे आदेश आहेत. त्यामुळे लोक बाहेर अथवा परगावी जाणे टाळत आहेत. शिवाय लॉकडाऊन लागण्याच्या शक्यतेमुळे प्रवासी रेल्वेने प्रवास करणे टाळत आहेत. सोलापूर विभागातील २०० लोक दररोज १४७ तिकिटे रद्द करीत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मृत्युदरातही मोठी वाढ दिसून येत आहे. रुग्णसंख्या व मृत्युदर कमी करण्यासाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद केले आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीत. शिवाय संपूर्ण राज्यात लॉकडाऊनबाबत चर्चा होत असल्याने लोक रेल्वेने प्रवास करण्याचे टाळत आहेत. आपली आजची कामे उद्या, परवा अन् महिन्यानंतर पुढे ढकलून घरातच राहणे पसंत करीत आहेत. मागील काही दिवसांपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.
- मुंबई, पुण्याची गर्दी ओसरली...
- कडक संचारबंदी व लॉकडाऊनच्या भीतीने पुणे, मुंबईमधील लोक सोलापूरकडे परतत होते. मात्र मागील आठवड्यापासून परत येणाऱ्यांची संख्या ओसरल्याचे पाहावयास मिळत आहे.n रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना केंद्र व राज्य शासनाने दिलेले कोरोनाविषयक सर्व नियम पाळणे बंधनकारक केले आहे.
- शासनाने धार्मिक स्थळे बंद केल्याने रेल्वेने पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विशेष रेल्वे गाड्यांनाही गर्दी कमीच...
रेल्वे प्रशासनाने कोरोनानंतर प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या होत्या. या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित तिकीट असलेल्यांनाच प्रवास करता येत होता, मात्र मागील काही दिवसांपासून याही विशेष गाड्यांमधील प्रवाशांची संख्या कमीच झाली आहे. प्रवासी संख्या घटल्याने रेल्वेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. मात्र मालवाहतूक गाड्या सुरूच आहेत.