भाजपकडे उमेदवारी मागणाºयांची संख्या वाढली; राष्ट्रवादीत अद्यापही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:52 PM2019-07-17T12:52:16+5:302019-07-17T12:55:21+5:30

माळशिरस विधानसभा मतदारसंघ; यंदाच्या निवडणूकीत समीकरणे बदलण्याची शक्यता

Number of requested candidates for BJP increased; NCP is still in disarray | भाजपकडे उमेदवारी मागणाºयांची संख्या वाढली; राष्ट्रवादीत अद्यापही शुकशुकाट

भाजपकडे उमेदवारी मागणाºयांची संख्या वाढली; राष्ट्रवादीत अद्यापही शुकशुकाट

Next
ठळक मुद्दे सध्या मोहिते-पाटील व पूर्वाश्रमीचे भाजपवासी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी तालुक्यात एकत्रित कार्यरत राखीव असलेल्या या मतदार संघात मोहिते-पाटील व उत्तमराव जानकर हे दोघेही आपला उमेदवार देण्यासाठी प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोहिते-पाटीलविना घटल्याने बालेकिल्ला राखण्यासाठी पक्षाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार

राजीव लोहकरे

अकलूज : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या माळशिरस तालुक्यात विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद घटली आहे. येणाºया विधानसभा निवडणुकीत भाजपचा वरचष्मा राहणार असल्याने भाजपकडून स्थानिक व बाहेरून येणाºया इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे. राष्ट्रवादीच्या गटात मात्र शांतता दिसून येत आहे.

माळशिरस तालुक्यात प्रत्येक वेळा पक्षीय राजकारणापेक्षा मोहिते-पाटील विरुद्ध विरोधक अशा निवडणुका लढविल्या जात होत्या. तालुक्यात मुंबई प्रांत व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत १९७८ चा अपवाद वगळता सतत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरचढ राहिले आहेत. माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील गटाचे सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील, कै. चांगोजीराव देशमुख, विजयसिंह मोहिते-पाटील हे काँग्रेसचे विधानसभा सदस्य झाले आहेत. सन १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केले.

१९९९ ते २००४ च्या निवडणुकीत तालुक्यातून निवडून आले. २००९ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघ मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव झाल्यावर सलग दोन्ही निवडणुकीत कै. हनुमंतराव डोळस विधानसभा सदस्य झाले. त्यामुळे माळशिरस विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख राहिली आहे. लोकसभा निवडणुकीतही पूर्वीचा पंढरपूर लोकसभा व सध्याच्या माढा लोकसभा मतदार संघात तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी राहिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेऊन भारतीय जनता पक्षाशी सलगी केली. पूर्वाश्रमीचे भाजपचे उत्तमराव जानकर, राजकुमार पाटील, के. के. पाटील व त्यांचे सहकारी आणि मोहिते-पाटील यांच्या एकत्रीकरणाने माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली गेली.

पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांनी भाजप प्रवेश केल्याने माळशिरस पंचायत समितीही भाजपच्या ताब्यात गेली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना तालुक्यात १ लाख २० हजार मतदान झाल्याने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे ८१ हजार एवढ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यात भाजपची ताकद वाढली तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद घटली आहे.

 हा मतदारसंघ भाजप-सेना युतीत भाजपच्या वाट्याला गेला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसव्यतिरिक्त मनसे, बहुजन वंचित आघाडीसह विविध संघटनांच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवतील. यामुळे माळशिरस विधानसभा निवडणुकीची लढत बहुरंगी होईल. मुख्य लढत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होईल. माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वाढलेल्या ताकदीमुळे भाजपकडून अनेक स्थानिक व बाहेरून येणाºया इच्छुक उमेदवारांच्या हालचाली होऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचा गट सध्या तरी शांत दिसून येत आहे.

भाजपकडून स्थानिकांमध्ये विद्यमान पंचायत समिती सदस्य अजय सकट, अतुल सरतापे, तृतीय पंथीय सरपंच माऊली कांबळे, स्व. हनुमंतराव डोळस यांचे चिरंजीव संकल्प डोळस, पोपट वाघमारे तर बाहेरचे खा. अमर साबळे, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती राम सातपुते, माजी मंत्री दिलीप कांबळे हे इच्छुक उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडून माजी झेडपी सदस्य अशोकराव गायकवाड, अ‍ॅड. अविनाश काले, राजेश गुजर, झेडपी सदस्य बाळासाहेब धार्इंजे, मनसेकडून किरण साठे, पीपल्स रिपब्लिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, दलित महासंघाच्या नगमा शिवपालक यांच्यासह अपक्ष व वंचित आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत.

उमेदवारी देताना होणार कसरत
- सध्या मोहिते-पाटील व पूर्वाश्रमीचे भाजपवासी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी तालुक्यात एकत्रित कार्यरत आहेत. येणाºया विधानसभा निवडणुकीत त्यांची एकी भारतीय जनता पक्षाला फायदेशीर ठरणार आहे. मात्र, उमेदवार निवडीत राखीव असलेल्या या मतदार संघात मोहिते-पाटील व उत्तमराव जानकर हे दोघेही आपला उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये भाजपची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांच्यात समेट घडविण्याची कसरत पक्षाला करावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोहिते-पाटीलविना घटल्याने बालेकिल्ला राखण्यासाठी पक्षाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

Web Title: Number of requested candidates for BJP increased; NCP is still in disarray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.