टँकरची संख्या ७० वर
By admin | Published: May 25, 2014 12:41 AM2014-05-25T00:41:01+5:302014-05-25T00:41:01+5:30
सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाई : उपाययोजनांचा प्रभाव नाही
सोलापूर: अनेक वर्षांपासून पाणी अडविण्याची कामे मोठ्या प्रमाणावर होऊनही तसेच उजनी धरणाचे पाणी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सोडूनही सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई काही केल्या हटेना झाली आहे. ८४ गावे व ४०७ वाड्यांसाठी तब्बल ७० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात असले तरी दररोज टँकरची मागणी येतच आहे. सोलापूर जिल्ह्यावर दरवर्षीच पाणीटंचाईचे सावट येते. पाऊस चांगला पडला तरीही काही गावात तरी टँकर द्यावेच लागतात. टँकरमुक्त जिल्हा होण्यासाठी अनेक वेळा आराखडे तयार झाले व त्यानुसार कामेही झाली. अनेक ठिकाणच्या पाण्याच्या स्रोताच्या आधारे अनेक गावांसाठी स्वतंत्र व संयुक्त पाणीपुरवठा योजना राबल्या गेल्या. बोअर, विहिरीचा आधार घेत नवनव्या योजना राबवूनही काही गावे दरवर्षीच टँकरच्या पाण्यावर विसंबून राहतात. मागील दोन वर्षांत पाऊस कमी झाल्याने वाड्यावस्त्यांच्या नागरिकांना पाण्यासाठी टँकर दिले होते. दोन वर्षे पाण्याच्या टंचाईने त्रासून गेल्याने पाणी अडविण्याच्या कामात जनतेनेही झोकून दिले होते. जिल्हाधिकार्यांनी केलेल्या आवाहनानुसार तलाव व बंधार्यातील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाले होते. नाल्याच्या खोलीकरणाचा प्रयोग मागील वर्षी यशस्वी झाला होता. अनेक ठिकाणच्या नाल्याचा गाळ शासनाच्या पैशातून निघाला. सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही पाणी अडविण्यासाठीची कामे झाली होती. तरीही यावर्षी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. २० मेपर्यंत यंदा जिल्ह्यात ८४ गावे व ४०७ वाड्यांना ७० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर व माळशिरस वगळता अन्य तालुक्यात टँकर सुरू झाले आहेत. या संख्येत दररोज भर पडताना दिसत आहे.
-------------------------
एवढे पाणी जाते तरी कुठे ? उजनीसह शेजारच्या जिल्ह्यातील धरणाचे पाणी जिल्ह्यातील बर्याच गावांच्या परिसरातून उन्हाळ्यातही मिळत आहे. गावोगावी पाणी अडविण्याची कामेही मागील वर्षी झाली होती. सरत्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने पाणी अडल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. याशिवाय गाळ काढण्याची कामेही झाली होती; तरीही टँकरची मागणी येतच आहे.
------------------------------
जिल्हाधिकार्यांनी शोध घेतला तर..? ज्या गावात टँकर सुरू आहेत व ज्या गावातून टँकरची मागणी आहे त्या गावांची जिल्ह्याधिकार्यांनी स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्याची गरज आहे. काही गावातील पाणीपुरवठ्यासाठी किरकोळ (विहिरी खोलीकरण, गाळ काढणे, बोअरमध्ये मोटार टाकणे, पाईपलाईनची दुरुस्ती करणे) कामे केली तर काही गावचे टँकर बंद होऊ शकतात. मात्र तातडीने तपासणी व उपाययोजना केली तरच टँकरची संख्या कमी होणार आहे.
---------------------------------
मागणी आली की टँकर द्यावा लागतो. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी मागील वर्षी केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा फायदा झाला. त्यामुळे टँकरची मागणी कमी झाली आहे. - डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी