उत्तर तालुक्यात बाधितांची संख्या पोहोचली ९५० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:20 AM2021-04-05T04:20:15+5:302021-04-05T04:20:15+5:30
सोलापूर: एका महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल ११२ व्यक्तींची भर पडल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील बाधितांची संख्या ९५० इतकी झाली ...
सोलापूर: एका महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल ११२ व्यक्तींची भर पडल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील बाधितांची संख्या ९५० इतकी झाली आहे. कळमण आरोग्य केंद्रांतर्गत गावातच ४१ रुग्ण वाढले आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावात एक जानेवारी २०२१ रोजी ८१५ कोरोनाबाधित होते. जानेवारी ते फेब्रुवारी या एका महिन्यात अवघे १३ रुग्ण वाढले होते. ३ फेब्रुवारी ते २ मार्च या एका महिन्यात ही संख्या अवघी १० ने वाढून ८३८ इतकी झाली होती. ३ मार्चनंतर कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत राहिली.
अवघ्या एका महिन्यात तब्बल ११२ कोरोनाबाधितांची भर पडली असल्याचे उत्तर सोलापूर तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले. जानेवारी महिन्यात उत्तर सोलापूर तालुक्यात कोरोनाबाधित संख्या ८१५ इतकी होती ती चार एप्रिल रोजी ९५० वर पोहोचली आहे. २ मार्च ते चार एप्रिल या कालावधीत तालुक्यात ११२ कोरोनाबाधित वाढले आहेत. यामध्ये कळमण आरोग्य केंद्रांतर्गत गावातच ४१ कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. तालुक्यात वडाळा गावात सर्वाधिक १४८ रुग्णसंख्या झाली आहे.
----
महिन्यात असे वाढले रुग्ण..
कळमण आरोग्य केंद्रांतर्गत गावात एका महिन्यात ४१ रुग्ण, कोंडी आरोग्य केंद्रांतर्गत गावात २२, मार्डी आरोग्य केंद्रांतर्गत गावात २५ तर तिऱ्हे आरोग्य केंद्रांतर्गत गावात २४ कोरोनाबाधितांची वाढ झाली.
* यामध्ये कौठाळी गावात ११, वडाळा गावात १३, बीबीदारफळमध्ये ६, नान्नजमध्ये ४ कोरोनाबाधित एका महिन्यात वाढले.
* रानमसले व शेरेवाडीत प्रथमच आढळले प्रत्येकी एक 'कोरोना' बाधित.
कोट
आम्ही तपासण्या व लसीकरण वाढविले आहे. नागरिकांनी तपासणी व लसीकरण करुन घ्यावे. मास्क वापरावा, बाहेरुन आल्यानंतर हात धुऊन घ्यावा, अंतर ठेवावे. तरच कोरोनावर मात करता येईल.
श्रीकांत कुलकर्णी
तालुका वैद्यकीय अधिकारी