आपण डायल केलेला नंबर बंद आहे.. कृपया काही वेळेनंतर प्रयत्न करा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:24 AM2021-09-18T04:24:23+5:302021-09-18T04:24:23+5:30
अक्कलकोट : दक्षिण व उत्तर या दोन्ही पोलीस ठाण्यांचे दूरध्वनी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. मोबाईलप्रमाणे दोन्ही दूरध्वनी स्वीच ...
अक्कलकोट : दक्षिण व उत्तर या दोन्ही पोलीस ठाण्यांचे दूरध्वनी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. मोबाईलप्रमाणे दोन्ही दूरध्वनी स्वीच ऑफ आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक प्रसंगात अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी पोलीस अधीक्षकांनी सूचना दिल्या असतानाही दोन्ही दूरध्वनी सुरू होत नाहीत.
दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७०हून अधिक गावे आहेत. सिनूर ते शेगाव या दोन गावांतील अंतरटोक ७० किलोमीटर आहे. यापैकी काही गावे संवेदनशील आहेत. या गावांमध्ये कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. तसेच तालुक्याला कर्नाटक सीमा लागून आहे. या भागातील लोकांना तत्काळ संपर्क साधण्यासाठी टेलिफोन सेवा अत्यावश्यक आहे.
तसेच उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५०हून अधिक गावे आहेत. याही हद्दीत सीमावर्ती भागात काही गावे आहेत. काही गावे संवेदनशील आहेत. पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास संपर्क कोणाशी करायचा ? असा प्रश्न आहे. एखादी मोठी घटना घडली तर पोलीस ठाण्यांशी संपर्क साधता येत नाही. मागील दोन वर्षात हे दूरध्वनी सातत्याने बंद, चालू होत आहेत.
याबाबत मागील महिन्यात पोलीस अधीक्षक डॉ. तेजस्वी सातपुते हे अक्कलकोट दौऱ्यावर असताना एका चर्चेत दूरध्वनी बंदचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी अधीक्षकांनी दोन्ही दूरध्वनी तत्काळ सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, हे दाेन्ही दूरध्वनी अद्याप सुरू झालेले नाहीत. याबाबत नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
---
सण, उत्सव अन निवडणूक हालचालींचा काळ
सध्या गणेशोत्सवाचा काळ आहे. यापाठोपाठ दसरा, दिवाळी सण, उत्सव येत आहेत. याच काळात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या हालचाली सुरू आहेत. अशा प्रसंगी टेलिफोन बंद असणे गैरसोयीचे होणार आहे.
---
अडचणीच्या काळात पोलीस ठाण्यात टेलिफोन सुरू असणे अत्यावश्यक आहे. दूरध्वनी सुरू करण्यात काय अडचणी आहेत ते पाहतोय. दोन्ही ठाण्यांचे दूरध्वनी येत्या दोन दिवसात पूर्ववत करू.
- डॉ. संतोष गायकवाड
उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट