परिचारिकांना आदर आणि सन्मान मिळायला हवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:22 AM2021-05-12T04:22:52+5:302021-05-12T04:22:52+5:30
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मिस फ्लॉरेन्स नाइटिंगल यांनी हातात लॅम्प घेऊन युद्धभूमीवर जखमी झालेल्या सैनिकांचा शोध घेत त्या सैनिकांची ...
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मिस फ्लॉरेन्स नाइटिंगल यांनी हातात लॅम्प घेऊन युद्धभूमीवर जखमी झालेल्या सैनिकांचा शोध घेत त्या सैनिकांची सुश्रूषा केली. त्यांच्या या कार्यातून जगासमोर ‘परिचारिका क्षेत्र’ उदयास आले. हातात लॅम्प घेऊन सैनिकांना शोधून त्यांची सुश्रूषा करून त्यांचे प्राण वाचविल्याबद्दल मिस फ्लॉरेन्स नाइटिंगल यांना ‘लेडी विथ लॅम्प’ असेही संबोधिले जाऊ लागले.
परिचारिका क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सन १८६० मध्ये लंडन येथे ‘नाइटिंगल नर्सिंग स्कूल’ या नावाने जगातील पहिले परिचारिका महाविद्यालय सुरू केले. गतवर्षी २०२० मध्ये त्यांच्या जन्म दिवसास २०० वर्षे पूर्ण झाल्याने व कोरोना कालावधीतील परिचारिकांच्या योगदानामुळे ‘जागतिक आरोग्य संघटने’मार्फत हे २०२० वर्ष ‘परिचारिका वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आले होते.
महामारीच्या विरोधातील खरी लढाई ही वैद्यकीय क्षेत्र आणि प्रामुख्याने परिचारिका क्षेत्र लढत आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता वैद्यकीय क्षेत्र व परिचारिका सामान्य नागरिकांचे जीव वाचविण्यात झटत आहेत.
रुग्ण जरी रुग्णालयात असला तरी त्याला रुग्णालयात घरातील वातावरण तयार करून लवकरात लवकर निरोगी बनविण्याचे काम आणि जबाबदारी परिचारिका क्षेत्रातील व्यक्ती अगदी सहजपणे करीत असतात. सामाजिक बांधीलकी जपत रुग्णसेवेचे काम अजून कसे करता येईल, यासाठी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. समाजातील काही समाज करंटे लोकांचा या क्षेत्रातील व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट आहे. तरी पण त्याच जोमाने, खंबीरपणे, ताकदीने आणि कर्तव्याच्या भूमिकेतून या क्षेत्रातील व्यक्ती एकनिष्ठेतून आपली सेवा बजावत आहेत. या कोविड-१९ महामारीच्या काळात कोविड-१९ विरोधात या क्षेत्रातील व्यक्ती सैनिकांप्रमाणे लढत आहेत. त्यामुळे त्यांना ‘कोविड योद्धे’ म्हणूनही संबोधिले जाते.
ज्याप्रमाणे कठीण काळात आपण पोलीस कर्मचारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी इत्यादींचे महत्त्व जाणून घेतले आणि त्यांचा सन्मान केला. आदर केला. त्याचप्रमाणे या परिचारिका क्षेत्राबद्दल या क्षेत्रात राहून आपली सेवा करणाऱ्या व्यक्तींबद्दलही आपण सन्मान आणि आदर व्यक्त केला पाहिजे. कारण या अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक व्यक्ती आणि घटकांमुळे आपण कोरोना विरोधातील युद्ध लवकर आणि शूरतेने जिंकणार आहोत, याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. या अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना त्यांच्या कामाचा मोबदला किती भेटतो? यापेक्षा समाजातील सर्व नागरिक आणि सर्व जग त्यांच्या सोबत उभे राहून त्यांना किती आदर आणि सन्मान बहाल करतो, हे फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच या परिचारिका क्षेत्रात व इतर अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या सर्व व्यक्तींना मानाचा मुजरा...!
-डॉ. राहुल जवंजाळ,
अध्यक्ष, एन.जी.ओ. नर्सिंग असोसिएशन, महाराष्ट्र राज्य