नटबाेल्ट तुटलेल्या एसटी बसला थांबविले, दुचाकीस्वाराच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:25 AM2021-08-23T04:25:04+5:302021-08-23T04:25:04+5:30
रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट-मंगळवेढा ही बस कर्जाळच्या बसस्थानकापासून सुसाट वेगाने धावत होती. सिद्धाराम पाटील आणि श्रीशैल पाटील ...
रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट-मंगळवेढा ही बस कर्जाळच्या बसस्थानकापासून सुसाट वेगाने धावत होती. सिद्धाराम पाटील आणि श्रीशैल पाटील हे दोन बंधू राखी पौर्णिमेसाठी आचेगावला दुचाकीवर निघाले होते. त्यांचे लक्ष एसटी बसच्या पाठीमागील चाकाकडे गेले. या चाकाचे काही नट बोल्ट निघून पडले होते तर, काही ढिले झाल्यामुळे चाक जोराने हलत होते. ही बाब पाटील बंधूंच्या लक्षात येताच त्यांनी एसटी बसचा पाठलाग सुरू केला. बसचा वेग अधिक होता शेवटी त्यांनी वळसंगच्या स्वामी समर्थ सूत मिल समोर आपली दुचाकी एसटी बसच्या समोर घेऊन बस थांबवली. बस चालकाला खाली उतरून पाठीमागच्या चाकाची अवस्था दाखवली बस चालकही गांगरून गेला. त्याने बस रस्त्याच्या कडेला थांबवून प्रवाशांना दुसऱ्या गाडीने जाण्याची विनंती केली. बसमधील प्रवाशांनी खाली उतरून पाहिले असता त्यांच्याही पोटात गोळा आला. सिद्धाराम पाटील आणि श्रीशैल पाटील या दोन बंधूंनी प्रसंगावधान दाखवले नसते. तर, मोठा अनर्थ घडला असता. सूत मिल समोरील उताराला ही बस धावताना कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. मात्र वेळीच सावध केल्याने संकट टळले.