कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सोलापुरात ढगांचे निरीक्षण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 02:47 AM2019-07-24T02:47:16+5:302019-07-24T02:47:29+5:30
पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरॉलॉजी (आयआयटीएम) तर्फे ‘कायपिक्स’ (क्लाऊड एअरोसॉल इंटरअॅक्शन अँड प्रेसिपिटेशन एन्हान्समेंट एक्सपेरिमेंट) नावाचा प्रयोग करण्यात येत आहे.
सोलापूर : कृत्रिम पावसासाठी अनुकुल असणाऱ्या ढगांच्या निरीक्षणास सोलापुरात मंगळवारी दुपारी सुरूवात झाली. भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) यांच्यावतीने या ढगांचे निरीक्षण सुरू आहे. या निरीक्षणासाठी आलेल्या विमानाने आज उड्डाण करीत सुमारे दोन तास अभ्यास केला.
मंगळवारी सकाळी तांत्रिक कारणास्तव विमानाचे उड्डाण होऊ शकले नाही. दुपारी २०० किमी त्रिज्याच्या क्षेत्रात ढग आणि पावसाचे परीक्षण करण्यासाठी एका विमानाने उड्डाण घेतले. दोन तासांच्या निरीक्षणानंतर हे विमान परत जमिनीवर आले. या विमानाने ढगातील आर्द्रतेचा अंदाज घेतला. गेल्या चार दिवसांपासून चार विमाने सोलापूर विमानतळावर उभी आहेत. अर्थात अनुकूल ढगनिर्मिती झाल्यानंतरच त्यांचे उड्डाण होईल.
कायपिक्स ४ ग्राऊंड कॅम्पेन या नावाने या प्रयोगाची सुरूवात मे २०१७ पासून सुरू करण्यात आली आहे. पावसाचे निरीक्षण करण्यासाठी या क्षेत्रावर १२० पाऊसमापी यंत्रे वापरुन एक नेटवर्क तयार केले आहे. सोलापूर कमी पर्जन्यछायेचा प्रदेश असल्याने याची निवड करण्यात आली. मात्र ढगांची निर्मिती होत नसल्याने प्रयोगात अडचणी येत आहेत.
रडार रेंजमध्ये विमान निरीक्षणासाठी मूळ स्थान म्हणून सोलापूर निवडले गेले आहे. वैज्ञानिक क्लाऊड सिडिंग प्रयोग-२०१८ ने कृत्रिम पावसासंदर्भात काही निरीक्षण केले. २०१९ मधील मुख्य प्रयत्न सोलापूरच्या उत्तर व दक्षिण भागातील रडार रेंजमध्ये असतील. या प्रयोगाद्वारे तयार केलेली सर्व वैज्ञानिक माहिती कॅल्शियम क्लोराईड फ्लेयर्स वापरुन क्षेत्रावरील हायग्रोस्कोपिक क्लाऊड सिडिंगची उपयुक्तता तपासण्यात उपयोगी ठरणार आहे. त्यानुसार, विमानाच्या मदतीने क्लाऊड बेसजवळ सिडिंग केले जाणार आहे.
रडार, पाऊसमापी यंत्रे आणि विमान निरीक्षणाद्वारे केल्या जाणाºया प्रयोगाचे पुढील मूल्यांकन करण्यात येणार आहे.