सोलापूर-अक्कलकोट महामार्गात दुभाजकाचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:49 AM2020-12-11T04:49:29+5:302020-12-11T04:49:29+5:30
जीव टांगणीला लागलेल्या येथील नागरिकांसाठी कर्देहळ्ळी फाट्यावर भुयारी मार्ग किंवा अन्य पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषदेतील भाजपचे ...
जीव टांगणीला लागलेल्या येथील नागरिकांसाठी कर्देहळ्ळी फाट्यावर भुयारी मार्ग किंवा अन्य पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषदेतील भाजपचे पक्षनेते अण्णाराव बाराचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सोलापूर-अक्कलकोट या सिमेंट रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, उड्डाणपूल व भुयारी मार्गाची कामे प्रलंबित आहेत. तीही गतीने सुरू आहेत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र कुंभारीच्या पुढे १ किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्देहळ्ळी फाट्यावर नागरिकांना सोलापूर शहराकडे येण्यासाठी कसलीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नाही.
रस्त्याच्या मधोमध दुभाजक बनविल्याने कर्देहळ्ळीसह सहा गावांतील नागरिकांना चुकीच्या दिशेने जीव मुठीत धरूनच मुख्य रस्त्यावर यावे लागत आहे. काम पूर्ण झाल्यावर तर खूपच मोठी गैरसोय होणार आहे. येथील नागरिकांना विरुद्ध बाजूने प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी मागणी करूनही उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करण्यात आला नाही. गरज नसताना अनेक हॉटेल व पेट्रोलपंपासाठी दुभाजक फोडून व सर्व्हिस रोड करून रस्ता दिला आहे. परंतु सहा गावांतील सुमारे ४० हजार लोकसंख्येसाठी भुयारी मार्ग नाही ना सर्व्हिस रोड केला नाही. त्यामुळे रस्ता ओलांडण्याची मोठी पंचाईत होऊन बसली आहे. सोलापूर-अक्कलकोट महामार्ग नागरिकांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी केला जात आहे, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
----
चुकीच्या बाजूने येण्यामुळे अपघाताची मालिका
गेल्या काही दिवसांपासून चुकीच्या बाजूने येण्यामुळे येथे अपघाताची मालिका सुरू झाली असून, आता नागरिकांच्या मदतीला जिल्हा परिषदेतील पक्षनेते बाराचारे हे धावून आले आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कर्देहळ्ळी फाट्यावर भुयारी मार्ग, सर्व्हिस रोड किंवा अन्य पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे. नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, अशी सोय करण्याची मागणी बाराचारे यांनी निवेदनात केली आहे.
----