शासकीय कामात अडथळा; नऊ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:29 AM2021-09-10T04:29:19+5:302021-09-10T04:29:19+5:30
पोलिसांनी भारत नवनाथ मेटकरी (रा. महुद), विजय दादासो कोळेकर व दादासो महादेव कोळेकर दोघे (रा. कटफळ, ता. सांगोला) यांच्यासह ...
पोलिसांनी भारत नवनाथ मेटकरी (रा. महुद), विजय दादासो कोळेकर व दादासो महादेव कोळेकर दोघे (रा. कटफळ, ता. सांगोला) यांच्यासह इतर पाच ते सहा अनोळखी इसमांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कटफळ येथील आटपाडी रोडलगत गट नं. ३ मध्ये शेतीच्या मोजणीकामी सरकारी नियमाप्रमाणे सहायक फौजदार संजय बगाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूराव झोळ, महिला पोलीस कॉन्स्टेबल रसाळ यांचा बंदोबस्त नेमला होता. भूमी अभिलेख कर्मचारी बुरांडे, महेश कुऱ्हाडे यांच्यासह सदर जागेवर हक्क सांगणारे भारत नवनाथ मेटकरी (महूद) व सदाशिव बिरा शेळके (रा. कटफळ) यांच्यासमक्ष गट नं. ३ मधील कटफळ दूरक्षेत्र चौकीची चारही दिशेची मोजणी दुपारी ३ च्या सुमारास झाली. संबंधित मालकी हक्क सांगणाऱ्या लोकांच्या सह्या घेऊन त्यातील सदाशिव शेळके यांना सदरची मोजणी मान्य नसल्याने त्यांनी सह्या न करता तेथून निघून गेले.
दुपारी ४ च्या सुमारास पोलीस पाटील बाळासाहेब मिसाळ यांनी पोलीस कॉन्स्टेबल बापूराव झोळ यांना सदर मोजणी केलेल्या ठिकाणी विनापरवाना तारेचे कंपाउंड करण्याचे काम सुरू आहे, असे फोनवरून सांगितले. त्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले असता वरील नऊजण शासनाचा कोणताही आदेश नसताना तारेचे कंपाउंड करीत असताना दिसून आले. त्या वेळी पोलिसांनी तुम्ही शासनाची कोणतीही परवानगी नसताना तार कंपाउंड करू नका, कायदेशीर मार्गाचा अवलंब करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे समजावले. असे असतानाही त्यांनी शासनाने नेमून दिलेले काम पूर्ण करून दिले नाही. उलट शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना शिवीगाळ केली.