सरकारी कामात अडथळा, तीन आराेपींना सश्रम कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 05:05 PM2024-01-17T17:05:25+5:302024-01-17T17:08:14+5:30
आरोपींना मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाने १७ जानेवारी रोजी सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा जानेवारी राेजी सुनावली.
समीर वानखेडे,डोणगाव : ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढत असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन आरोपींना मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाने १७ जानेवारी रोजी सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा जानेवारी राेजी सुनावली.
डोणगाव ग्रामपंचायतच्या हद्दीतील कन्हाळवाडी शिवारातील गट क्रमांक ३९१, ३९२ मधील शासकीय गायरान जमिनीवर बळीराम भिकाजी बोरकर यांनी अतिक्रमण केले होते. १७ मार्च २०२० रोजी अतिक्रमण काढण्यासाठी सर्व शासकीय बाबी पूर्ण करून बळीराम बोरकर यास समजावून सांगण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थ बळीराम बोरकर याने थैलीतील लोखंडी कोयता काढून कामकाज बंद करा नाहीतर सर्वांना कापून काढू, असे धमकावू लागला, असे डोणगाव पोलिसांत ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर गणपत चनखोरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. घटनेच्या वेळी चनखोरे, सहायक उपनिरीक्षक गीते, पोलिस कर्मचारी गजानन धोंडगे, पवन गाभने, चव्हाण आदी हजर होते.
पोलिसांनी सिद्धार्थ बोरकर यास पकडण्याचा प्रयत्न केला असता गीते यांच्या उजव्या हाताचा अंगठा व बोटास मारून त्याने जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकार पक्षाचे वकील जी.जी. पोफळे यांनी सात साक्षीदार तपासले. साक्षी पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायधीश एस.के. मुंगीलवार यांनी आरोपी बळीराम भिकाजी बोरकर, सिद्धार्थ बळीराम बोरकर, राजू बळीराम बोरकर यांना भादंवि कलम ३५३ नुसार सहा महिने सश्रम कारावास, ५ हजार दंड, कलम ३३२ नुसार ६ महिने सश्रम कारावास, ५ हजार रुपये दंड, कलम ५०४ व ५०६ नुसार प्रत्येकी ३ महिने सश्रम कारावास, २ हजार दंड आणि कलम १८८ अन्वये १ महिना सश्रम कारावास, २०० रुपये दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली.