पीक पाण्याच्या दाखल्यासाठी तलाठ्यांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:21 AM2021-02-14T04:21:11+5:302021-02-14T04:21:11+5:30
बँकेचे कर्ज मिळविण्यासाठी पीक पाण्याचा दाखला आवश्यक आहे. महसूलकडून सातबारा उताऱ्यावर पीक पाण्याची नोंद केली जाते. परंतु ज्या सातबारावर ...
बँकेचे कर्ज मिळविण्यासाठी पीक पाण्याचा दाखला आवश्यक आहे. महसूलकडून सातबारा उताऱ्यावर पीक पाण्याची नोंद केली जाते. परंतु ज्या सातबारावर एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे आहेत, त्या उताऱ्यावरील पीक नेमके कोणत्या शेतकऱ्याचे आहे, याची बँकेकडून कर्ज मंजुरी देताना खातरजमा करावी लागते. यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या नावे स्वतंत्र पीक पाण्याच्या दाखल्याची मागणी केली जाते. परंतु असा दाखला काही तलाठी देत आहेत, तर काही तलाठी टाळाटाळ करीत आहेत. यामुळे आम्ही कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
सातबारावर स्वतंत्र नोंद करा
सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा जास्त नावे असतील तर बँकेकडून पीक पाण्याच्या दाखल्याची मागणी केली जाते. हा दाखला देण्यास बहुतांश तलाठ्यांकडून नकारात्मक उत्तरे दिली जातात. ज्या पिकांचा शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल केला जातो त्या शेतकऱ्यांना दाखला देण्यासाठी अडवणूक केली जाते. असा नाहक त्रास देण्यापेक्षा सातबारा उताऱ्यावर प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावे पीकपाणी नोंद करून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
कोट
मागील २ ते ३ वर्षांपासून पीकपाणी दाखला देणे बंद झाले आहे. त्यामुळे मी दाखला देऊ शकत नाही. तुम्ही बँकेला स्वयंघोषणा पत्र द्या.
- सुशीलकुमार तपसे
तलाठी, नेमतवाडी
कोट
सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा जास्त नावे असतील तर अशा शेतकऱ्यांना पीकपाणी दाखला देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ.
- विवेक साळुंखे
तहसीलदार, पंढरपूर
कोट
आमच्या शेतीमध्ये ज्या प्रकारची पिके आहेत, त्याचा प्रत्येकवर्षी शेतसारा भरतो. मग आम्हाला तसा दाखला देण्यास टाळाटाळ करून अडचणीत पकडण्याचा प्रकार महसूल विभाग करीत आहे.
- सुधीर अमराळे
शेतकरी, नेमतवाडी