लऊळमध्ये डॉक्टरच्या शेतजमिनीत अतिक्रमण करून वहिवाटीस अडथळा; सहा जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:12 AM2021-03-30T04:12:08+5:302021-03-30T04:12:08+5:30
कुर्डूवाडी : जातीवाचक शिवीगाळ व आमच्या जमिनीत बेकायदेशीरपणे अतिक्रमण करुन आमच्याच शेतजमिनीत आम्हाला प्रवेश व वहिवाट करण्यास अटकाव केल्याच्या ...
कुर्डूवाडी :
जातीवाचक शिवीगाळ व आमच्या जमिनीत बेकायदेशीरपणे अतिक्रमण करुन आमच्याच शेतजमिनीत आम्हाला प्रवेश व वहिवाट करण्यास अटकाव केल्याच्या डाॅ. दिनेश कदम यांच्या फिर्यादीवरून लऊळ येथील सहा जणांवर कुर्डूवाडी पोलिसांत ॲट्रासिटीचा गुन्हा नोंदला आहे.
पोलीस सुत्रांनुसार कुर्डूवाडी येथील फिर्यादी डाॅ. दिनेश कदम यांची लऊळ येथे १ हेक्टर ६५ आर. जमीन आहे. या जमिनीचा सातबारा उतारा व कब्जे वहिवाट फिर्यादीची आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये फिर्यादीच्या वरील जमिनीत लऊळ येथीलच अशोक देशमुख, सुमन देशमुख, खंडू देशमुख, बालाजी देशमुख व अशोक देशमुख यांच्या दोन सुना यांनी फिर्यादी कदम यांच्या कब्जे वहिवाटीस विरोध केला. त्याबाबत माढा कोर्टात दावा दाखल होऊन नोव्हेंबर २०२० मध्ये माढा कोर्टाने फिर्यादी कदम यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे. तरीदेखील फिर्यादीला वरील लोक आडकाठी व गुंडगिरी करुन त्या जमिनीतून हाकलून देत आहेत.
शेतजमिनीच्या वहिवाटीकरिता गेले असता फिर्यादी व फिर्यादीचा पुतण्या रवींद्र यास ठार मारण्याच्या धमक्या दिल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. २७ मार्च २०२१ रोजी फिर्यादी व त्यांची पत्नी ज्योती, पुतण्या रवींद्र व त्याची पत्नी रेश्मा ट्रॅक्टर चालक बाबासाहेब गरड, दीपक गरड, मजूर नवनाथ गरड, लक्ष्मण भोंग हे फिर्यादीच्या जमिनीत दोन ट्रॅक्टरसह जमीन नांगरण्यासाठी गेले. तेव्हा वरील लोकांनी ट्रॅक्टर समोर उभे राहून जमिनीत येण्यासाठी अटकाव केला. यावेळी सुमन देशमुख यांनी जातीवाचक भाषा वापरून जमिनीत यायचे नाही. आलात तर आम्ही आत्महत्या करु व छेडछाडीची पोलिसात तक्रार करु, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी जातीवाचक शिवीगाळ केली व फिर्यादीच्या जमिनीत बेकायदेशीर अतिक्रमण करुन त्यांना जमीन वहिवाट करण्यास अटकाव केला, असे डॉ. कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केलेले आहे. .......................